नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील कथित कॅसिनो फोटोवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर राजकारण तापले. या मुद्द्यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राऊत नागपुरात आले तर त्यांना जोडे मारू, असा इशारा दिला आहे. या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बावनकुळे हे मकाऊ येथे कौटुंबिक सहलीसाठी गेले असता कॅसिनोत त्यांनी एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उधळल्याचा आरोप करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. या मुद्द्यावर जिल्ह्यातील अपवाद वगळता बहुतांश भाजप आमदार व पदाधिकारी गप्पच राहिले व कुणीही राऊत यांच्यावर टीका केली नाही. सुधाकर कोहळे यांनी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे आहेत व ते मूर्ख व्यक्ती आहेत. त्यांनी वायफळ बडबड बंद केली नाही तर त्यांना वैदर्भीय भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यांना अशी चिखलफेक शोभत नाही. मात्र ते असेच आरोप करत राहिले तर त्यांना योग्य प्रत्युत्तर देऊ. ते नागपुरात आले तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना जोडे मारतील, असे कोहळे म्हणाले.