नागपूर : स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, स्वावलंबन या आधारावर देशाच्या भविष्याचा विचार करणारे हिंदुत्व हे सर्वसमावेशक असून जातीवाद, सांप्रदायिकता, अस्पृश्यतेपासून मुक्त आहे, असा पुरोगामी विचार मांडणारा साहित्यिक, कवी, आद्यक्रांतिकारक आणि देशभक्त म्हणून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशासाठी आदर्श आहेत. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वत:ला झोकून देऊन, ज्या व्यक्तीने देशासाठी सर्वस्व अर्पण केले. त्या सावरकरांना, त्यांच्या परिवाराला स्वातंत्र्यानंतरही उपहास व अपमान सहन करावा लागतोय, हे दुर्दैव आहे. एकसंध राष्ट्र हा विचार मांडणारे सावरकर श्रेष्ठ नसतील तर कुणीच श्रेष्ठ नाही, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
अखिल भारतीय साहित्य परिषद व राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने उदय माहूरकर व चिरायू पंडित यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘वीर सावरकर’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. हा प्रकाशन सोहळा शनिवारी सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अ. भा. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्रीधरजी पराडकर उपस्थित होते. याप्रसंगी पुस्तकाचे मराठी अनुवादक ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक डॉ. उदय निरगुडकर, अविनाश पाठक, ॲड. लखनसिंग कटरे, नितीन केळकर आदी उपस्थित होते. ‘वीर सावरकर - फाळणी रोखण्याची क्षमता असणारा माणूस’ या पुस्तकावर बोलताना डॉ. निरगुडकर म्हणाले की, सावरकरांवर झालेला खोटानाटा प्रचार भारताच्या इतिहासात कुणावर झाला नाही. स्वातंत्र्यानंतरही त्यांच्यावरील शालेय पुस्तकातील धडे गाळले गेले. अजूनही त्यांना वैरभावना ठेवून वागविले जात आहे. त्यांनी देशाची एकता, अखंडतेसाठी केलेल्या कार्याचे हे पुस्तक शब्दपुजन आहे. अध्यक्षीय मत व्यक्त करताना श्रीधरजी पराडकर म्हणाले की, अहिंसेच्या अतिरेकामुळे या देशातील साहित्यात इतिहास, हिंदू धर्म, शौर्य या विषयाला हाताळले जात नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पाठक व सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
- डिजिटल माध्यम स्वीकारा
सावरकरांवरील हे पुस्तक साधे नाही. याला सैद्धान्तिक आधार आहे. यामध्ये अभ्यास करून मांडलेले इतिहासातील दाखले आहेत. पण, नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवायचे असेल तर आता डिजिटल माध्यम स्वीकारण्याची गरज आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाने ॲप तयार करून त्यावरून या पुस्तकातील छोटे छोटे प्रसंग तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विचार करावा, असे आवाहन गडकरी यांनी लेखकांना व प्रकाशकांना केले.