नागपूर : 'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. अखेर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवून खार पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणाच्या विरोधात राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. हनुमान चालिसा पठणासाठी शिवसेनेने माझ्या घरी यावे, मी त्यांना विरोध न करता त्यांचे स्वागतच करीन असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि राणा दाम्पत्याच्या विरोधातील कारवाईचा निषेध व्यक्त करताना आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. शिवसेनेला राणा दाम्पत्याचा इतका विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. हनुमान चालिसा म्हणण्यासाठी त्यांच्यासाठी तंबू बांधला असता, चहापाण्याची अन् प्रसादाची व्यवस्था केली असती तरी पुरे झाले असते असे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
माझ्या घरी जर कुणी हनुमान चालिसा पठणासाठी आले तर त्यांना मी टाळ मृदंग देईल, लाडवाचा प्रसाद आणि जेवणाची सोय करील असे आ. बावनकुळे म्हणाले. हनुमान चालिसा पठणात राजकीय पक्ष महत्वाचा नाही. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष. दोन्ही कार्यकर्त्यांचे माझ्याघरी स्वागतच होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी हनुमान चालिसा पठणासाठी जरूर यावे, माझ्या घरात त्यांचे आदरतिथ्य होईल असेही आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्या हल्ल्यामागे मुंबई पोलीस
किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा असताना त्यांच्यावर दगडफेक होते हे बरे नाही. त्यांच्यावरील हल्लेखोरांना पोलिसांचा अलिखित पाठींबा मिळतो आहे. महाविकास आघाडी सरकार ब्रिटिशांपेक्षा अधिक जुलमी सरकार असून प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.