नागपूर : रस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवत असताना सर्वच नियमांचे पालन करणे अनिवार्य असते. मात्र अनेक वाहनचालकांना नियमांची पूर्ण माहितीच नसते. विशेषतः वाहनांशी संंबंधित नियमांबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येते. गाडीला मागचा दिवा नसेल तर दंड आकारण्याची तरतूद वाहतूक कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढचाच नाही तर मागील दिवादेखील दुरुस्त करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
मागील दिवा नसेल तर हजारांचा दंड
नियमानुसार वाहनाला मागील दिवा नसेल तर वाहनचालकाला एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा ही चूक केल्यास परवाना निलंबित करण्याची कारवाईदेखील होऊ शकते. मात्र अनेक वाहनचालकांना नियमांची माहितीच नसल्याचे दिसून येते.
अपघाताचा धोकादेखील कमी होतो
वाहनाचा मागचा दिवा बिघडला असेल किंवा खराब असेल तर त्याची दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. ‘लोकमत’ने या नियमाबाबत काही वाहनचालकांना विचारणा केली असता त्यांना याची कल्पनाच नव्हती. विशेष म्हणजे एकालाही यासंदर्भातील दंडदेखील झाला नव्हता. मागील दिवा असेल तर रात्रीच्या वेळी अपघाताचा धोकादेखील कमी होतो. वाहनचालकांनी नियमांचे पालन करत वाहनाच्या मागील दिव्याबाबत सजग राहावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलिसांकडून कारवाई वाढविण्याची गरज
साधारणत: रात्रीच्या वेळी नागपुरात मर्यादित वाहतूक पोलीसच दिसून येतात. त्यामुळे वाहनाचा दिवा सुरू नसला तरी फारशी कारवाई होताना दिसून येत नाही. मागील आठ महिन्यांत मोजक्या वाहनचालकांवरच कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.