नागपूर : राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना मी त्यात सहभागी होणार नाही, असे ठरविले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितल्यानंतर मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. हेच नेते व पक्षामुळे मी राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकलो होतो. माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या नागपुरात आगमनाप्रसंगी काढण्यात आलेल्या विजय रॅलीदरम्यान लक्ष्मीभुवन चौकातील छोटेखानी सभेदरम्यान ते बोलत होते.
फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्याने त्यांचे समर्थक नाराज होते. आपल्या सभेदरम्यान फडणवीस यांनी या सर्व कार्यकर्त्यांना परत जोमाने कामाला लागण्याचे संकेतच दिले. २०१९ साली शिवसेनेसोबत बहुमत आणले होते. मात्र, त्यांनी आमच्याशी बेईमानी केली व पाठीत खंजीर खुपसला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने व निधड्या छातीने आम्ही नवीन सरकार आणले. हे सरकार सहा महिने चालेल, असे भाकीत काही लोक वर्तवत आहेत. २०१४ मध्येदेखील याच लोकांनी एक वर्षदेखील सरकार चालणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आम्ही पाच वर्षे पूर्ण केली होती. पुढील निवडणुकीत आम्ही बहुमताचे सरकार आणू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
रोज संताप यायचा, वाईट वाटायचे
मागील अडीच वर्षांत राज्यात सगळीकडे दुराचार व अत्याचार वाढला होता. कुठेही प्रशासन दिसून येत नव्हते व सरकारी यंत्रणेत समन्वय नव्हता. राज्य कोण चालवत आहे हेच कळत नव्हते व महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली होती. विदर्भ-मराठवाड्याला सावत्र वागणूक दिली जात होती. विदर्भ विकास मंडळ बंद केले तर विजेची सबसिडी बंद केली. विकासकामांचा निधी दुसरीकडे पळविला होता. या प्रकारामुळे रोज संताप यायचा व वाईटदेखील वाटायचे, असे फडणवीस यांनी सांगितले.