योगेश पांडे - नागपूर: महायुतीसमोर अद्यापही बंडखोरांचे आव्हान कायम असून त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा भाजपकडून अगोदरच देण्यात आला आहे. मात्र सोमवारी जे बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद होतील, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. नागपुरात ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अपक्ष अर्ज भरणाऱ्यांमध्ये मुंबईतील गोपाळ शेट्टी यांचेदेखील नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचे संपूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेले ते उद्यापर्यंत निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील. आर्वी मतदारसंघातून दादाराव केचे अर्ज मागे घेण्यास तयार झाले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पक्षातील निष्ठावंत अर्ज मागे घेतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.
लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर टीका करणारे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यावर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. खरगे यांनी लाडकी बहिण, शेतकऱ्यांची वीज बिलमाफी या योजना चुकीच्या असून त्या सरकारला दिवाळखोरीकडे नेतील असे विधान करून आपले महिला व शेतकरीविरोधी आकस उघड केला आहे. कॉंग्रेसने लाडकी बहीण योजनेविरोधातच षडयंत्र केल्याचा आरोप बावनकुळे यांनी लावला.कॉंग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमधील महिलांसाठी सुरू असलेल्या योजना बंद पाडल्या किंवा जाहीर करून त्या पूर्ण केलेल्या नाहीत.
कॉंग्रेसने मतदारांची फसवणूक केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपविण्याची भाषा केली आहे. नाना पटोले हे त्यांचे समर्थन करतात. देशाला आरक्षणाची गरज नाही असे म्हणणाऱ्या राहूल गांधी यांना आम्ही जाब विचारू. महाविकास आघाडीच्या नेत्यांजवळ बोलण्यासाठी काहीच मुद्दे नाहीत, असा दावादेखील बावनकुळे यांनी केला.