नागपूर : कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या स्वस्त धान्य योजनेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली नाही. पण आता गॅस सिलिंडरमुळे रेशन कार्ड रद्द होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविली आहे. यात भरून द्यावयाच्या अर्जात गॅस कनेक्शन असेल तर रेशन कार्ड रद्द होईल, असे हमीपत्र लिहून घेतले जात आहे.
सध्या रेशन दुकानांमध्ये कार्डधारकांना माहिती सादर करण्याचा अर्ज दिला जात आहे. यात कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वार्षिक उत्पन्न, व्यवसायाची माहिती तसेच गॅस सिलिंडरची माहिती द्यायची आहे. या माहितीसोबतच सर्व सदस्यांचे आधारकार्ड, वीज बिलाची झेरॉक्स, गॅस कनेक्शनचे कार्ड जोडायचे आहे. या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. त्यात ‘कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांचे नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे’, असे हमीपत्र भरून द्यावे लागत आहे. या अटीमुळे शिधापत्रिकाधारक अडचणीत येणार असून, शिधापत्रिका रद्द होण्याची भीती कार्डधारकांना आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी असून बहुतांश लोकांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणीदेखील आहे. हे हमीपत्र गरिबांच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणारे आहे. विभागाने अर्जानुसार कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणात कार्डधारकांच्या शिधापत्रिका रद्द होऊ शकतात.
- सार्वजनिक वितरण व्यवस्थाच बंद पाडायची आहे
कृषी कायद्यामंध्ये शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्याचे अधिकार व्यापाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शासनाजवळ धान्यच राहणार आहे. परिणामी सार्वजनिक वितरण व्यवस्था बंद करावी लागेल. हा प्रकार एकप्रकार सरकारचे षडयंत्र आहे.
संजय पाटील, निमंत्रक, रिपब्लिकन आघाडी
- शिधापत्रिका रद्द होणार नाही
विभागाकडे रेशनकार्ड धारकांजवळ असलेल्या गॅस सिलिंडरची संपूर्ण माहिती आहे. तरीही तपासणी मोहिमेच्या माध्यमातून तीच माहिती विभागाकडून मागितल्या जात आहे. कार्डधारकांनी न घाबरता माहिती द्यावी. गॅस सिलिंडर असल्यास शिधापत्रिका रद्द होणार नाही, असा दावा रेशन दुकानदार संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी केला आहे.