कमलेश वानखेडे
नागपूर : आ. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने आतापासूनच विधान निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप - शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच, अन्यथा आपण विधानसभेच्या १५ जागा लढवणार, असा अप्रत्यक्ष इशारा आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी नागपुरात दिला.आ. कडू म्हणाले, मंत्री मंडळ विस्ताराचा विषय गंमतीचा झाला आहे. २० मंत्री करायचे आहेत, ५० लोक रांगेत आहेत. आता विस्तार आहे म्हणून अर्धे लोक मुंबईतंच असतात. विस्तार केल्यावर भुकंप होईल अशी स्थिती नाही. विस्तार झाल्यावर कुणी बाहेर जाणार नाही, उलट
इकडेच येतील. आपल्याला मंत्रीपदाची चिंता नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार दिव्यांग मंत्रालयाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
बंडखोरांनाच मोठी पदे मिळतात
- राजकारणात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना मोठी पदे मिळालेली आहेत. २०१९ मध्ये बंडखोरी करणारे अजित पवार नंतर उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांनी मतदारांच्या विरोधात बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीत ते मुख्यमंत्री झाले. पटोले भाजप सोडून गेले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. तेसुद्धा मुख्यमंत्री झाले. येथेही जे निष्ठावान होते, ते मागे राहिले. बंडखोरांनाच मोठी पदे मिळाल्याचा इतिहास आहे, असे सांगत आ. बच्चू कडू यांनी त्यांच्या मनातील सल व्यक्त केला.
हे शरद पवारांना माहित नसेल का ?
- शरद पवार हे मजबूत नेते आहेत. मग त्यांच्याच परिवारातील व्यक्ती पहाटे शपथ घ्यायला जातो, हे त्यांना माहित नसेल का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला. कदाचित शरद पवार यांची हिरवी झेंडी असेल म्हणून अजीत पवार शपथ घ्यायला गेले असतील. जर शरद पवार यांना माहिती नसेल तर मग बंड करुनंही अजीत पवार यांना उपमुख्यमंत्रीपद का दिलं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.