राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने राेवणीला आलेले सुकले आणि शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पऱ्हे टाकावे लागले. शेतातील विहिरीला पाणी आहे. पण, डिमांड नाेट भरूनही वर्षभरापासून महावितरण कंपनीने वीज जाेडणी दिली नाही. वीज मिळाली असती तर पाण्याअभावी पऱ्हे सुकले नसते, अशी प्रतिक्रिया साेनेघाट (ता. रामटेक) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
रमेश रहाटे, बंडू रहाटे व रामदास रहाटे तिघेही रा. साेनेघाट हे धान उत्पादक असून, त्यांची साेनेघाट शिवारात शेती आहे. शेतमालाचे उत्पादन व पर्यायाने उत्पन्न वाढावे म्हणून या तिन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात विहिरी खाेदल्या. विहिरींना मुबलक पाणी लागल्याने त्यांनी महावितरण कंपनीकडे वर्षभरापूर्वी अर्ज करून कृषिपंपाचे वीज कनेक्शन मागितले. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डिमांड नाेट व विजेच्या खांबाची रक्कमही भरली. परंतु, त्यांना अद्यापही वीज कनेक्शन देण्यात आले नाही.
चालू खरीप हंगामात मृग नक्षत्रात पाऊस काेसळताच या शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. मध्येच पावसाने दडी मारल्याने तसेच त्याला पाणी देणे शक्य न झाल्याने पऱ्हे सुकले. मात्र, हिंमत न हारता या तिन्ही शेतकऱ्यांनी पुन्हा पऱ्हे टाकले. ते पऱ्हे राेवणीयाेग्य झाले असून, पाऊस येत नसल्याने सुकण्याच्या मार्गावर आहे. वीज नसल्याने विहिरीतील पाणी बादलीने काढून पऱ्हे जगवणे सुरू आहे, अशी माहिती रामदास रहाटे यांनी दिली. महावितरण कंपनीच्या या प्रकारामुळे व लाेकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
...
डिमांड नाेट व खांबाची रक्कम भरली
कृषिपंपाचे वीज कनेक्शन मिळावे म्हणून आपण जून २०२० मध्ये नियमानुसार डिमांड नाेटच्या रकमेचा महावितरण कंपनीकडे भरणा केला. ट्रान्सफार्मरपासून शेतापर्यंत वीज घेण्यास तीन खांबांची आवश्यकता असल्याने, त्यासाठी प्रत्येकी अतिरिक्त १० हजार रुपये भरले. त्यानंतर निधी उपलब्ध नसल्याचे महावितरणच्या उपअभियंत्याने सांगितल्याने, पुन्हा प्रत्येकी १२ हजार रुपयांचा भरणा केला, अशी माहिती रमेश रहाटे, बंडू रहाटे व रामदास रहाटे यांनी दिली.
...
रबी पीक घेणे अशक्य
ओलिताची काेणतीही साेय नसल्याने साेनेघाट व सालेमेटा या भागातील शेतकऱ्यांना केवळ खरीप पिके घ्यावी लागतात. काहींनी ओलितासाठी शेतात विहिरी खाेदल्या. मात्र, महावितरण कंपनी त्यांना वीज कनेक्शन द्यायला दीर्घ दिरंगाई करीत आहेत. काही शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे वीज कनेक्शन आहे. मात्र, थ्री फेज वीजपुरवठा व्यवस्थित केला जात नसल्याने इच्छा व कष्ट करण्याची तयारी असूनही रबीची पिके घेता येत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.