नागपूर : राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करी तसेच विक्रीचे प्रमाण वाढत असून हा मुद्दा शुक्रवारी विधानपरिषदेतदेखील उपस्थित करण्यात आला. राज्यातील ड्रग्जविरोधात पोलीस विभागाची लढाईच सुरू आहे. मात्र जर ड्रग्जविक्री करणाऱ्या आरोपींसोबत कुणी हातमिळावणी केली अथवा त्यांचे संगनमत असेल तर कलम ३११ अंतर्गत संबंधित पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांला थेट सेवेतून बडतर्फच करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.
अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भातील मुद्दा मांडला होता. खोपोलीत ७० ते ८० किलो एमडी पावडर जप्त झाल्याची बाब त्यांनी मांडली. त्यावर बोलताना फडणवीस यांनी राज्य शासनाची भूमिका मांडली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती. यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल चर्चा झाली. तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अंमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळेच विशेषत: संभाजीनगर, रायगड, नाशिक, पुणे या भागांतील बंद कारखान्यांत हालचाल आढळल्यास तेथे छापे टाकण्याची कारवाई सुरू आहे. राज्यात पोलीस विभागातर्फे ड्रग्जविरोधात लढाई सुरू असून ती बराच काळ चालेल. अनेकदा बाहेरील राज्यातील पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्यांना मिळालेल्या ‘इंटेलिजन्स’च्या आधारावर ती कारवाई होते. मात्र बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात येते, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.