नागपूर : केवळ १० सदस्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सुरू झालेल्या विदर्भावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचे भाषण चर्चेचा विषय ठरले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे सगळेच काम मेरिटवर आहे. त्यांनी देशभरात रस्त्यांचे काम केले म्हणून सरकारचे काम नीट सुरू आहे. तो एक माणूस सोडला तर विदर्भात आहे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
त्यानंतर खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीकेचा सूर लावला. विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याने नितीन गडकरी आणि वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात सहभागी झाले होते. विदर्भ वेगळा होईस्तोवर लग्न करणार नाही या फडणवीसांच्या भीष्मप्रतिज्ञेचे काय झाले? सत्तेत आले तर वेगळा विदर्भ विसरले का? असा सवाल राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी केला. खडसेंच्या या भीष्मप्रतिज्ञेच्या मुद्द्याने सत्ताधारी बाकांवरील सदस्यांसोबत विरोधकांनादेखील धक्काच बसला. फडणवीसांनी अशी प्रतिज्ञा कधी घेतली होती याचीच चर्चा सुरू होती. अखेर फडणवीसांनी उत्तरादरम्यान यावर स्पष्टोक्ती दिली. नाथा भाऊंनी नवा शोध लावला असून मी तर असे बोललेच नव्हतो. त्यावेळी तर तेच माझे नेते होते, मग त्यांनी का लग्न थांबविले नाही, असे म्हणत फडणवीस यांनी नाथाभाऊंचीच विकेट काढली.