राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांनो, पतीपासून स्वेच्छेने विभक्त होण्याचा विचार करीत असाल तर, सावधान! कारण, अशा महिला फौजदारी प्रक्रिया संहिता(सीआरपीसी)अंतर्गत पोटगी मिळण्यास अपात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे. हा निर्णय लागू झाल्यास महिलेला पोटगीपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे तिच्यावर स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन शोधण्याची वेळ येईल.न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी नुकताच हा निर्णय दिला. पती पालनपोषण करण्यास तयार नसल्यास पत्नीला फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ अंतर्गत पोटगीसाठी दावा करता येतो. परंतु, पत्नी पतीपासून स्वेच्छेने विभक्त झाली असेल, ती चारित्र्यहीन असेल किंवा ती कोणत्याही ठोस कारणाशिवाय पतीसोबत राहण्यास तयार नसेल तर, अशा वेळी पत्नी कलम १२५(४)अनुसार पोटगीसाठी अपात्र ठरते. उच्च न्यायालयाने ही तरतूद लक्षात घेता, एका प्रकरणामध्ये स्वेच्छेने पतीपासून विभक्त झालेल्या पत्नीला पोटगीसाठी अपात्र ठरविले आहे.हे प्रकरण नागपुरातील दाम्पत्याशी संबंधित आहे. १९७५ मध्ये त्यांचे लग्न झाले तर, १९७९ मध्ये त्यांनी स्वेच्छेने विभक्त होण्याचा लेखी करार केला. पत्नीने पोटगी न मागण्याची ग्वाहीही दिली. परंतु, २००४ मध्ये पत्नीने अचानक पोटगीसाठी कायदेशीर नोटीस पाठविली. पतीने तिला दाद दिली नाही. त्यामुळे तिने फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ अंतर्गत पोटगी मिळण्यासाठी जेएमएफसी न्यायालयात अर्ज दाखल केला. तो अर्ज अर्ज खारीज झाला. परिणामी तिने सत्र न्यायालयात अपील दाखल केले. सत्र न्यायालयाने जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय रद्द करून, पत्नीला ७०० रुपये महिना पोटगी मंजुर केली होती. त्या निर्णयाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने कायद्यातील तरतूद लक्षात घेता, सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला व पत्नी पोटगी मिळण्यास अपात्र असल्याचे जाहीर केले.विभक्ततेला झाली ३८ वर्षेप्रकरणातील दाम्पत्याच्या विभक्ततेला ३८ वर्षे झाली आहेत. पतीने दुसरे लग्न केले असून, दुसºया पत्नीपासून त्याला तीन अपत्ये आहेत. पहिल्या पत्नीने स्वत:ची चूक उमगल्यामुळे विभक्ततेनंतर २५ वर्षांनी पोटगीचा दावा केला होता. परंतु, तिला पोटगीची तरतूद लागू झाली नाही.
पतीपासून स्वेच्छेने विभक्त झाल्यास ‘पोटगी’ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 1:43 AM