लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारने पीओपी मूर्तीच्या विक्री व वापरावर बंदी घातली आहे. या मूर्तींची खरेदी आणि विक्री कायद्याने गुन्हा आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पीओपी मूर्तीवरील बंदीसंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी मनपा मुख्यालयातील बैठकीत आढावा घेतला. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, आरोग्य समितीचे सभापती महेश महाजन, उपायुक्त राजेश भगत, विजय देशमुख, पशुचिकित्सक अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
पीओपी मूर्तीसंदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे झोनस्तरावर जनजागृतीचा कार्यक्रम आखण्यात यावा. मूर्ती खरेदी आणि विक्री कायद्याने आता गुन्हा ठरतो. खरेदी अथवा विक्री केल्यास दहा हजाराचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त, दोन वर्षे बंदी, याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घ्या, कचरागाड्या, चौकातील ध्वनिक्षेपक आदी ठिकाणांहून यासंदर्भात माहिती देणाऱ्या ऑडिओ क्लिप प्रसारित करा, अशी सूचनाही महापौरांनी केली.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून डेंग्यू, मलेरिया याविषयी जनजागृती करण्यात यावी. यासाठी झोननिहाय तीन पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली.
टास्क फोर्स तयार करा
कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करा. मूर्तिकार, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती यांचाही समावेश असावा. विसर्जन करताना पीओपी मूर्ती आढळली तर भक्तांवरही कारवाई केली जाणार आहे.
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
पीओपी मूर्तीसंदर्भात माहिती आणि तक्रारींसाठी मनपा मुख्यालयात टोल फ्री क्रमांक जाहीर करा. मनपाच्या अधिकृत सोशल मीडियावरून, वृत्तपत्रातून हा क्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचवा. त्यावर येणाऱ्या तक्रारींची त्वरित दखल घ्या. वृत्तपत्र आणि अन्य माध्यमातून यासंदर्भात जागरूक करण्याचे निर्देश देण्यात आले.