नागपूर : पत्नी व्याभिचारी असल्याचा आरोप करणाऱ्या आणि पत्नी व तिच्या नातेवाइकांविरुद्ध पोलीस तक्रार नोंदविणाऱ्या पतीची चालाखी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ओळखली अन् पत्नीला नांदविण्यासाठी या पतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. पत्नीला व्याभिचारी म्हणतो तर तिच्यासोबत संसार कसा करणार, असा सवालही पतीला विचारून त्याच्या हेतूवर संशय व्यक्त करण्यात आला.
न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. प्रकरणातील पती अमरावती, तर पत्नी जालना येथील रहिवासी आहे. त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला आहे. पतीने पत्नीवर विविध आरोप केले होते. पत्नीचे आधीच लग्न झाले होते. परंतु, तिने पहिल्या लग्नाची माहिती लपवून ठेवली. घरी काही महिने चांगली राहिल्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाला. ती पहिल्या पतीसोबत सतत बोलत होती. वैवाहिक जबाबदाऱ्या टाळत होती. एक दिवस ती कोणतेही ठोस कारण नसताना घर सोडून निघून गेली, असे पतीचे म्हणणे होते. असे असताना त्याने सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल करून पत्नीला नांदविण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंब न्यायालयाने प्रकरणातील तथ्य लक्षात घेता ती याचिका फेटाळून लावली. परिणामी, पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयानेही त्याला दणका दिला.पती मानसिक छळ करतोपती पैशांकरिता शारीरिक व मानसिक छळ करतो. सतत भांडतो. वैवाहिक संबंध ठेवत नाही. अनेकदा समजावल्यानंतरही त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. काही दिवसांनी तो चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. त्यामुळे त्याच्यासोबत राहणे कठीण झाले आहे, अशी बाजू पत्नीने मांडली होती.