नागपूर : पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष, संगत, स्टाइल स्टेटमेंट, शिक्षणातील जीवघेणी स्पर्धा यातून आलेला तणाव आणि खिशात खुळखुळणाऱ्या पैशांमुळे युवावर्ग तंबाखू, गुटखा आणि सिगारेटच्या आहारी गेला आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे सुमारे ३५ टक्के लोकांना तोंडाचा कॅन्सर होत आहे. यामुळे कुणावर गाल, तर कुणावर जीभ कापण्याची वेळ येत आहे. तरी व्यसन काही सुटता सुटेना, अशी स्थिती आहे.
आजचा तरुण महत्त्वाकांक्षी आहे. स्पर्धात्मक युगात, आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. काय चांगलं, काय वाईट या गोष्टींची पारख करून निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याला तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम माहीत आहेत, मात्र तरीदेखील तरुणवर्गात तंबाखू सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी युवावर्ग आपले आयुष्य खडतर बनवत आहे.
-मुलं अनुकरण करतात
घरात वडील किंवा आजोबांना व्यसन असेल तर त्याचे अनुकरण मुले करतात. ७० वर्षांचा माणूस सिगारेट ओढतो आणि त्याला काही होत नाही, तर आपल्याला काय होणार? असा गैरसमज करून व्यसनाच्या विळख्यात अडकतात.
तंबाखूच्या सेवनाने कॅन्सरचा धोका अधिक
अनेक रोगांच्या जन्माचे कारण तंबाखू आहे. तंबाखूच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढतो. तोंडासोबतच पॅनक्रियाटिक कॅन्सर, अन्ननलिका आणि पोटाच्या कॅन्सरलाही तंबाखू कारणीभूत ठरतो. तंबाखूच्या सेवनामुळे पचन तंत्रातील कोणत्याही भागात कॅन्सर होण्याची शक्यता अनेक पटीनेही वाढते.
-हृदयरोगाशी संबंधित धोका वाढतो
तंबाखूचे सेवन व तपकिरी ओढण्याच्या सवयीमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत असल्याचे अभ्यासातून सामोर आले आहे.
तंबाखूमध्ये कॅन्सरला पूरक ठरणारे २८ घटक
तंबाखूमध्ये कॅन्सरला पूरक ठरणारे २८ घटक असतात. तंबाखूचे सेवन करणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपानाचे व्यसन लागण्याची शक्यता जास्त असते.
दरदिवशी ५ हजार मुले तंबाखूच्या विळख्यात
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्करोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोेक दिवान यांनी सांगितले, भारतात दरदिवशी जवळपास ५ हजार मुला-मुलींना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागते. तंबाखूमुळे भारतात वर्षाकाठी साधारण ८५ हजार रुग्ण तोंडाच्या कर्करोगाला तर विडी व सिगारेटमुळे ७३ हजार रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगाला बळी पडतात. यात महिलांचे प्रमाणही वाढत आहे. ३०-४० टक्के कॅन्सर थेट तंबाखूमुळे होतो.