लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छातीत दुखत असेल, हृदयविकाराचा झटका आला असेल आणि मेडिकलमध्ये उपचारासाठी जात असाल तर तुम्हाला वेळेचे व दिवसाचे भान ठेवण्याची गरज असल्याचा अजब फतवा औषधवैद्यकशास्त्र विभागाने काढला आहे. तंत्रज्ञ नसल्याचे कारण पुढे करून रविवारसह इतर सुटीच्या दिवशी व रात्री ८ नंतर ईसीजी बंद ठेवण्याचा अजब निर्णय विभागाने घेतला आहे.
‘ईसीजी’ म्हणजे, इलेक्ट्रो कार्डियोग्राम. हृदयाच्या रक्तभिसरण प्रक्रियेत (पंपिंग) हृदय बंद सुरू होण्यास ‘इलेक्ट्रिकल-अॅक्टिव्हिटी’ कारणीभूत असते. ईसीजी चाचणीद्वारे हृदयाच्या या इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटीची नोंद होऊन त्याचा आलेख तयार होतो. यातून हृदयाची गतीची नियमितता व अनियमितता कळते. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यास ईसीजीमध्ये बदल होतात आणि त्यावरून ‘हार्टअटॅक’, हृदयाला झालेली हानी किंवा हृदयाचा कप्प्यांचा वाढलेला आकार याचे निदान होते. रुग्णसेवेत हे यंत्र महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र, विदर्भासह आजूबाजूच्या राज्यांतील रुग्णांचा भार असलेल्या मेडिकलमध्ये तंत्रज्ञ नसल्याचे कारण देऊन रुग्णांना वेठीस धरले जात आहे.
-ईसीजीची वेळ दुपारी २ ते ८ वाजेपर्यंतच
मेडिकलच्या ईसीजी कक्षाच्या दारावर रविवारच्या दिवशी व इतर दिवशी केवळ दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंतच ईसीजी सुरू राहील, असा फलक लावण्यात आला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी किंवा सुटीच्या दिवशी हृदयविकाराचे रुग्ण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
-तंत्रज्ञ नसल्याचे दिले कारण
औषधवैद्यकशास्त्र विभागाने ईसीजी बंद ठेवण्याच्या कारणाचे पत्रही कक्षाच्या दारावर लावले आहे. यात ‘ईसीजी’ तंत्रज्ञानाची कमतरता असल्यामुळे हा विभाग चालविणे शक्य नाही असे म्हटले आहे. सोबतच ईसीजी विभाग रात्रपाळीत, शासकीय सुटीच्या दिवशी व रविवारी बंद राहणार असल्याचाही उल्लेख आहे.