सुमेध वाघमारे
नागपूर : आरटीओच्या ऑनलाइन लर्निंग लायसन्सच्या परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा देण्याचे आणि धडाधड पास होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते. परंतु ‘वेब कॅम’ सुरू ठेवून परीक्षा देणे सुरू होताच २७ दिवसांमध्येच १७३ जण नापास झाले. विशेष म्हणजे, परीक्षा देताना इकडे-तिकडे पाहिले तरी उमेदवार अपात्र होत आहेत. यामुळे कधी नव्हे ते आरटीओच्या परीक्षेला गंभीरतेने घेतले जात आहे
परिवहन विभागाने आधार क्रमांकाचा वापर करून आरटीओच्या १४ फेसलेस सेवा सुरू केल्या. यात घरी बसून ‘लर्निंग लायसन्स’ काढण्याचाही समावेश आहे. परंतु याच्या ‘ऑनलाइन’ परीक्षेवर आतापर्यंत कोणाची नजर नव्हती. यामुळे ‘डमी’ उमेदवाराना बसून परीक्षा देण्याचा गोरख धंदाच सुरू होता. ‘लोकमत’ने हा प्रश्न लावून धरला. याची दखल परिवहन विभागाने घेतली. १५ डिसेंबरपासून ‘वेब कॅम’ सुरू ठेवूनच लर्निंग लायसन्सची परीक्षा देण्याची सक्ती केली. यामुळे महिन्याभराच्या आतच गैरमार्गाला आळा बसल्याचे दिसून आले.
‘प्रॉक्टरिंग’च्या माध्यमातून ‘वॉच’
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणने १५ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ या दरम्यान ‘फेसलेस’ पद्धतीने ऑनलाइन लर्निंग लायसन्सची परीक्षा देणाऱ्यामधून १७३ उमेदवारांना नापास केले. यातील बहुसंख्य उमेदवार हे कोणाच्या तरी इशाराने किंवा इकडे-तिकडे पाहून परीक्षा देत होते. याची नोंद ‘वेब कॅमेऱ्या’चा ‘प्रॉक्टरिंग’ प्रोसेसमध्ये झाली. तशा सूचना आरटीओ कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यामुळे त्यांनी या उमेदवाराला नापास केले.
तब्बल १७ ‘डमी’ उमेदवारांनी दिली परीक्षा
नागपूर ग्रामीण आरटीओने रिजेक्ट केलेल्या १७३ उमेदवारांमधून १७ जणांची परीक्षा ‘डमी’ उमेदवारांनी दिल्याचे ‘वेब कॅम’मधून पुढे आले. आता त्यांच्यावर काय कारवाई होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रम्हपुरी येथील एका सायबर कॅफेवर गुन्हा दाखल
ब्रम्हपुरी येथील सायबर कॅफेवर याच प्रकारातून गुन्हा दाखल करण्यात आला. डमी उमेदवाराला बसवून ‘लर्निंग लायसन्स’ची परीक्षा दिल्याचे स्वत: उमेदवाराने आरटीओकडे कबूल केले. याची गंभीर दखल घेत चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांत तक्रार करणार
दुसऱ्याच्या नावाने लर्निंग लायसन्सची परीक्षा दिल्यास संबंधित अर्जदार मोटार वाहन कायद्यानुसार लायसन्ससाठी कायमस्वरूपी अपात्र ठरतो. ‘प्रॉक्टरिंग’मध्ये दिसून आलेल्या १७३ अर्जदारांची चौकशी केली जाईल. त्यात ते दोषी आढळल्यास पोलिसांत तक्रार करण्यात येईल.
-विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण