नागपूर : उपवास म्हटला की भगर, शेंगदाणा, साबुदाणा या पदार्थांचा हमखास वापर होतोच. उपवासाच्या तसेच व्रतवैकल्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर विक्री वाढते. भगर हा तृणधान्याचा प्रकार आहे. पचायला हलका असल्याने त्याला अनेक कुटुंबांमध्ये पसंती असते; मात्र त्याचा दर्जा निकृष्ट असला तरी चव आणि आरोग्यही बिघडते. मागील काळात राज्यात काही ठिकाणी निकृष्ट भगरमुळे फुडपाॅयझनच्या घटना घडल्याने अन्न व औषध प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
भगरीचा भाव काय?
सध्या खुल्या बाजारामध्ये १३५ ते १४० रुपये किलोग्रॅम दराने भगर विकत मिळते. यात खुली आणि पाकीटमधील पॅकबंद भगर असा प्रकार आहे. पॅकबंद भगरची किंमत खुल्यापेक्षा थोडी अधिक असते.
दुकानदारांनी काय काळजी घ्यावी?
भगर विकताना दुकानदारांनी मॉश्चराइज असलेला माल विकू नये. ग्राहकांना माल देताना बिलही द्यावे. ग्राहकांनीही बिलासाठी आग्रह धरावा. भविष्यात आरोग्याची तक्रार उद्भवल्यास या बिलावरून संबंधित विक्रेत्यावर कारवाई करता येते.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी खुली भगर खरेदी करण्याऐवजी पॅकबंद खरेदीला प्राधान्य द्यावे. पाकीटावरील बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंगची तारीख, उत्पादक, मुदत या सर्व बाबी तपासून पाहाव्यात. मॉश्चराईज माल खरेदी करू नये.
महाशिवरात्रीमुळे मागणी वाढली
महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक उपवास करतात. त्यामुळे भगरीची मागणी शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जवळपास चार पटीने ही मागणी वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी आधीच जास्तीचा माल बोलावला आहे.
भंडारा, महाप्रसादावेळी काळजी घ्या
भंडारा, महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणावर भगरीचा उपयोग होतो. अशावेळी भगर निवडून, स्वच्छ करूनच वापरावी. स्वयंपाकाची भांडी, पाणी झाकून ठेवावे. वापरले जाणारे रॉ मटेरियल स्वच्छ हवे. स्टोअरेज व्यवस्थित असावे. शक्यतो भाविकांना गरम पदार्थच द्यावे.
मागील महिन्यात भगरीचे नमुने घेतले. बहुतेक चांगले होते. त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातही नमुन्यांची तपासणी केली होती. ग्राहकांची कुण्या दुकानाबद्दल तक्रार असेल तर आमच्या कार्यालयाकडे तक्रार करावी, दखल घेतली जाईल.
- सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त (अन्न)
...