नागपूर : बेळगावच्या कारागृहात पैसा फेकला की सर्व काही मिळते, असा धक्कादायक खुलासा बेळगावच्या तुरुंगातून नागपुरात आणलेल्या कुख्यात आरोपी जयेश ऊर्फ जपेश कांथा ऊर्फ साकीर ऊर्फ साहीर याने धंतोली पोलिसांना दिलेल्या बयाणात केला आहे.
आरोपी जयेश ऊर्फ जपेश कांथा ऊर्फ साकीर ऊर्फ साहीर याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटींची खंडणी मागत घातपात घडविण्याची धमकी दिली होती. सध्या हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिस त्याची बारकाईने चौकशी करीत आहेत. आरोपीने आतापर्यंत दोन वेळा केंद्रीय मंत्री गडकरींच्या कार्यालयात फोन करून खंडणी मागत घातपाताची धमकी दिली आहे. पहिल्यांदा आरोपीला बेळगावला ताब्यात घेण्यासाठी गेलेले नागपूर पोलिस कायदेशीर अडचणीमुळे रिकाम्या हाताने परतले होते. परंतु आरोपीने दुसऱ्यांदा धमकीचा फोन केल्यानंतर नागपूर पोलिसांनी आरोपीला बेळगाववरून विमानाने नागपुरात आणले.
दुसऱ्यांदा गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यासाठी माझ्याकडे मोबाइल नव्हता. परंतु कारागृहातील एका अधिकाऱ्याला ३० हजार रूपये दिल्यानंतर त्याने आपणास मोबाइल उपलब्ध करून दिल्याचे आरोपीने धंतोली पोलिसांना सांगितले. कारागृहाच्या बॅरेकमध्ये दुसऱ्यांदा त्याच्याकडे मोबाइल आल्यामुळे पोलिसही त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत. १४ जानेवारी २०२३ रोजी दाखल प्रकरणात पोलिसांनी कांथाला अटक केली आहे. पोलिस कोठडी संपल्यामुळे पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. कांथा वेळोवेळी आपले बयाण बदलत आहे. कारागृहातून बाहेर निघण्यासाठी आणि आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन केल्याचे तो सांगत आहे. रविवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर धंतोली पोलिस पुन्हा त्याची पोलिस कोठडी मिळविणार असल्याची माहिती आहे.
.................