नागपूर : कुणबी, ओबीसी समाज हा शांतताप्रिय समाज आहे. मात्र सरकारने आमच्या हक्काचा वाटा दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सरकारला धक्का दिला शिवाय राहणार नाही, असा इशारा सर्व शाखीय कुणबी, ओबीसी कृती समितीने रविवारी दिला. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिकाही यावेळी स्पष्ट करण्यात आली.
कृती समितीतर्फे रविवारपासून संविधान चौकात बेमुदत आंदोलनास सुरुवात करण्यात आली. कृती समितिचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाने पाटील यांचे सोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, गुणेश्वर आरिकर,राजेश काकडे, रमेश चोपडे, जानराव केदार, प्रल्हाद पडोळे,प्रा अवंतिका लेकुरवाळे, बाबा तुमसरे सुरेश गुडधे पाटील, राजेंद्र कोरडे,सुरेश वर्षे, राजेश काकडे,राज तिजारे,बाळा शिंगणे, मिलिंद राऊत, राजेश चुटे, सुरेश कोंगे, सुषमा भड ,अरुण वराडे, डॉ राजेश ठाकरे, विवेक देशमुख आदींनी कुणबी- ओबीसीच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला. किशोर गजभिये, शकील पटेल आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन करीत पाठबळ दिले.
वडेट्टीवार, राऊत, भोयर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी दिली भेट
- आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितिन राऊत, आमदार पंकज भोयर, माजी आमदार सुधाकरराव कोहळे, दिनानाथ पडोळे, परिणय फुके, डॉ. आशीष देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय आजी- माजी लोकप्रतिनिधींनी भेट दिली. विशेष म्हणजे आंदोलनाच्या विचारपीठावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपले मत मांडता आले नाही. सर्व नेत्यांनी कृती समितीला च्या सदस्यांना भेटून आंदोलनास व मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
विविध संघटनांकडून पाठिंबा
- कास्ट्राईब फेडरेशनचे अरुण गाडे यांनी समर्थन जाहीर केले.- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आ. सुधाकर अडबाले यांनी भेट देत संघटनेतर्फे समर्थन जाहीर केले.- संघर्ष वाहिनी व बेलदार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र बढीये यांनी समर्थन जाहीर केले.
तेली समाज १२ पासून सहभागी होणार
- संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने सुभाष घाटे यांनी आंदोलनाला दिले. तेली समाज बांधव १२ सप्टेंबरपासून या आंदोलनात सहभागी होतील, अशी घोषणा त्यांनी केली.
ओबासी समाज संघटनांनी सहभागी व्हावे- शहाणे
- मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश केला तर ओबीसीमध्ये येणाऱ््या इतर जातींचाही वाटा कमी होणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील सर्व संघटनांनी या आंदोलनाच सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांनी केले.