नागपूर : राज्यात चार वर्षांपूर्वी सिंगल एकल वापर प्लास्टिकच्या उत्पादनावर बंदी घातली होती. आता पुन्हा केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, वापर किंवा विक्री करण्यास १ जुलैपासून बंदी घातली आहे. त्यामुळे व्यापक स्तरावर कारवाई करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. प्लास्टिक वापरण्यासंदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास २५ हजारांचा दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा देखील आहे.
- १ जुलैपासून थेट कारवाई
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याचे नमूद करण्यात आले. त्यानुसार १ जुलैपासून संपूर्ण शहरात मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या या निर्णयाला साथ देत शहरातील व्यापारी बांधवांनी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
- ना आईस्क्रिम स्टीक ना प्लास्टिक प्लेट
प्लास्टिक स्टीकवाले इअर बड्स, प्लास्टिकचे झेंडे, चॉकलेटची प्लास्टिक कांडी, आईस्क्रिमची प्लास्टिक कांडी, थर्माकोल, प्लास्टिकचे कप, प्लेट, ग्लास, चमचा, चाकू, स्ट्रॉ, मिठाईला लावण्यात येणारी प्लास्टिक फिल्म, निमंत्रण पत्रिका, सिगारेटचे पॅकेट, १०० मायक्रॉनपेक्षा कमी पीव्हीसी बॅनर्स, सर्वच प्रकारचे प्लास्टिक बॅग, प्लास्टिकचे पॅकेजिंग मटेरियल आदी साहित्यावर बंदी घातली आहे.
- काय आहे दंडाची तरतूद
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल; परंतु तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास २५ हजार रुपये दंड व तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा आहे.
- दुकानदार, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती
महापालिकेच्या उपद्रव पथकाने प्लास्टिक वापर टाळण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध झोनमध्ये रॅली काढली. लाऊडस्पीकर लावून बाजारपेठेत जनजागृती करण्यात आली. बाजारपेठांमध्ये फिरून नागरिकांना, व्यापारी बांधवांना, दुकानदारांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले.