लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूचना, आवाहन आणि विनंती करूनही रिकामटेकडी मंडळी दाद देत नाही. त्यांचे विनाकारण रस्त्यावरून इकडेतिकडे फिरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी दंडुक्याचा प्रसाद देऊन पोलीस ठाण्यात (ठाण्याच्या आवारात) बसवून ठेवण्याचा प्रयोग सुरू केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ती अधिक वाढू नये म्हणून पोलीस नागरिकांना त्यांच्या घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन करीत आहेत. या आवाहनाला दाद मिळत नसल्याचे पाहून पोलिसांनी हात जोडून विनंती केली आहे. काही ठिकाणी फूल देऊन तर काही ठिकाणी चक्क हार घालून पोलिसांनी गांधीगिरी सुरू केली आहे. या माध्यमातून शहरात विनाकारण इकडे-तिकडे फिरणाऱ्याना रोखण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. गस्तीवरील पथकांच्या माध्यमातून लाऊड स्पीकरवरून कडक कारवाईचा इशारा दिला जात आहे. मात्र अजूनही रिकामटेकडे पोलिसांना दाद देत नाहीत. त्यांना कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप लक्षात आला नाही की काय म्हणून ते विनाकारण इकडेतिकडे फिरत आहेत. भर उन्हात इकडून तिकडे फिरणाऱ्यांमध्ये केवळ तरुण आणि प्रौढच नव्हे तर महिला आणि तरुणींचाही समावेश आहे. त्याही बिनधास्त इकडेतिकडे फिरताना आढळत आहेत. त्यामुळे या सर्वांना रोखण्यासाठी पोलिसांनी आता आपली कार्यपद्धत बदललेली आहे. आता अशा रिकामटेकड्यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन त्यांची वाहने जप्त करण्यासोबतच त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याचा प्रयोग पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रयोगाचा रिकामटेकड्या मंडळीवर कसा प्रभाव पडतो, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.जरीपटक्यात हार घालून स्वागतपोलिसांच्या आवाहनाला आणि कारवाईच्या इशाऱ्याला न जुमानता रस्त्याने फिरणाऱ्या अनेकांना बुधवारी जरीपटका पोलिसांनी हार घातले. वाहनचालकांचे वाहन रस्त्याच्या बाजूला नेऊन पोलिसांनी त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना आता तरी कोरोनाचा धोका लक्षात घ्या, अशी विनंती केली. त्यांच्या हातात चालान ठेवले आणि आताही नाही मानलात तर यापुढे कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.