लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेना संपर्क मोहिमेंतर्गत पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी नागपुरातील संघटनेचा विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेतला. यावेळी राऊत यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मनमोकळेपणाने भूमिका मांडण्यास सांगितले.
शहरात शिवसेनेची अद्याप हवी तशी ताकद नाही. काही प्रभागांमध्ये सेनेला सक्षम उमेदवारच सापडलेले नाहीत. दक्षिण नागपुरात दोन जिल्हाप्रमुख, युवासेनेचे दोन शहरप्रमुख आहेत. परंतु प्रभाग क्रमांक ३३, ४४, ४५ व ४६ मध्ये उमेदवार मिळालेले नाहीत, हे वास्तव कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले. विदर्भात शिवसेनेला मजबूत करायचे असेल तर मनपा निवडणुका गंभीरतेने घ्या, असे निर्देशच राऊत यांनी यावेळी दिले.
राऊत यांनी रवी भवन येथे पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेतला. यावेळी संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे व किशोर कुमेरिया, शहरप्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, प्रवीण बरडे, मंगेश काशीकर प्रामुख्याने उपस्थित होते. मनपा निवडणुकीत नागपुरातून शिवसेनेच्या कमीत कमी ४० जागा निवडून आल्या पाहिजेत. यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन संपर्क करण्याची गरज आहे. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: नागपूरवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून, त्यासाठीच मला इकडे पाठविले आहे. येथील पदाधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
महामंडळात पदाधिकाऱ्यांना स्थान द्या
‘मन की बात’ करताना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिकादेखील मांडली. महामंडळांमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांना स्थान दिले गेले पाहिजे, अशी मागणी समोर आली. तुमची भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन राऊत यांनी यावेळी दिले.