मंगेश व्यवहारे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर केवळ पोलिसांच्या दंडापासून बचावण्यासाठी करतात. त्यामुळे दर्जाहीन हेल्मेट वापरले जाते. अशात एखादा छोटा अपघातही जीवघेणा ठरू शकतो. हेल्मेट डोक्याच्या सुरक्षेसाठी अतिशय उपयुक्त असल्याने ते दर्जेदार असायला हवे. ते नीट वापरले गेले पाहिजे, त्यासाठी नागपुरातील ऑटोमोबाइलतज्ज्ञ निखिल उंबरकर यांनी हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालूच होणार नाही, असे सर्किट तयार केले आहे. तेही अवघ्या ७० रुपयांत.
निखिल यांनी आपल्या दुचाकीत हे उपकरण लावले आहे. हेल्मेट घालून त्याचा बेल्ट व्यवस्थित लावत नाहीत, तोपर्यंत त्यांची दुचाकी सुरू होत नाही. निखिल हे अनेक वर्षांपासून अपघातमुक्त वाहतुकीसाठी संशोधन करीत आहेत. त्यातूनच हे सर्किट तयार झाले आहे. या सर्किटचा स्वत: वापर करीत आहेत. हेल्मेट घातल्यानंतरही किरकोळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू होतो. यामागच्या कारणांचा निखिल यांनी अभ्यास केला. या अभ्यासात हेल्मेट अनेकजण केवळ पोलिसांच्या सक्तीपासून बचाव करण्यासाठी वापरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
गाडी देते इशारा
गाडीच्या इग्निशनला सेंसर लावले आहे. आयआर रिसीव्हर, ट्रान्झिस्टर, कॅपॅसिटर, बॅटरी आदी वापरून हे सर्किट तयार केले आहे. ते गाडीत इन्स्टॉल केले आहे. त्यामुळे गाडी हेल्मेट घातल्यानंतर बेल्ट लावला नसेल, तर इशारा देते. बेल्ट लावल्यानंतरच दुचाकी सुरू होते. अशी मिळाली प्रेरणा
दुचाकीस्वार हेल्मेटच्या नावाने काहीही वापरत असल्याचे निखिल यांना निरीक्षणातून दिसून आले. काही बहाद्दर तर कोलमाईन्समध्ये काम करणाऱ्या कामगारांकडे असलेल्या टोप्या हेल्मेट म्हणून वापरत असल्याचे दिसले. अनेकजण हेल्मेट केवळ डोक्यात टाकतात, पण बेल्ट लावत नाहीत. अशात अपघात झाल्यास किंवा दुचाकीवरून पडल्यास हेल्मेट एकीकडे आणि दुचाकीस्वार दुसरीकडे असे बरेचदा त्यांना दिसले. असे दर्जाहीन हेल्मेट वापरल्यामुळे किरकोळ अपघातदेखील गंभीर ठरतो, हे लक्षात आल्यानंतर निखिल यांनी संशोधन सुरू केले.
स्वत: च्या सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे
पोलिसांच्या भीतीने नाही, तर स्वत: च्या सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे आहे. याची सवय दुचाकीस्वारांना लागावी, म्हणून हे सर्किट तयार केले आहे. -निखिल उंबरकर, ऑटोमोबाइलतज्ज्ञ.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"