महत्त्वाची फाईल तातडीने तयार करायची होती : पोलीस महासंचालकांची स्पष्टोक्ती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नक्षली कारवायांच्या संबंधाने महत्त्वपूर्ण कागदपत्रे तातडीने तयार करायची होती. त्यामुळे नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी एएनओ) शरद शेलार यांना आपण गडचिरोलीला सोबत नेण्याऐवजी नागपुरात बसून ती कागदपत्रे (फाईल) तातडीने तयार करण्यास सांगितले. त्याचमुळे ते आपल्यासोबत गुरुवारी गडचिरोलीला येऊ शकले नाही, असे सांगून पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथुर यांनी शेलार यांच्या न झालेल्या हेलिकॉप्टर वारीच्या संबंधांने विनाकारण उडविल्या जाणाऱ्या वावड्या थांबवल्या. गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन उडवून दिले. त्यामुळे या घातपातात एक जवान शहीद झाला. तर, १७ जवान गंभीर जखमी झाले. या घटनेच्या संबंधाने पोलीस महासंचालक माथुर गुरुवारी नागपुरात आले होते. ते येथून गडचिरोलीला जायला निघाले. सोबत शेलारसुद्धा होते. विमानतळावरून पोलीस महासंचालकांचे हेलिकॉप्टर गडचिरोलीला उडण्यासाठी सज्ज झाले असताना शेलार हेलिकॉप्टरमधून खाली उतरले आणि एएनओ कार्यालयात पोहचले. त्यासंबंधाने उलटसुलट वावड्या उठल्या. परिणामी सर्वत्र चर्चेला उधाण आले. पोलीस दलातही शेलार यांच्या न झालेल्या गडचिरोली हेलिकॉप्टर वारीच्या संबंधाने तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले. लोकमतने या संबंधाने पोलीस महासंचालक माथुर यांच्याशी संपर्क करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासंबंधाने बोलताना महासंचालक माथुर म्हणाले, नक्षलवादी हल्ल्याच्या घटनेच्या संबंधाने अत्यंत महत्त्वाची माहिती तातडीने वरिष्ठांकडे पाठवायची असल्याचा निरोप ऐनवेळी मिळाला. त्यामुळे आपण शेलार यांना ती फाईल तयार करण्याची जबाबदारी सोपवली. त्याचमुळे त्यांना सोबत न नेता आपण गडचिरोलीला गेलो. राज्याच्या सुरक्षेच्या संबंधाने अनेक बाबी गोपनीय ठेवाव्या लागतात. कोणतेही वृत्त प्रसारित करताना ही बाब प्रकर्षाने ध्यानात घ्यायला हवी, असे माथुर म्हणाले. ही जबाबदारी पार पाडल्यानंतर शेलार शुक्रवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्यावर होते, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. या संबंधाने प्रकाशित झालेले वृत्त निराधार असल्याचे ते म्हणाले. खुद्द पोलीस महासंचालकांच्या या प्रतिक्रियेमुळे शेलार यांच्या न झालेल्या हेलिकॉप्टर वारीच्या वादावर आपसूकच पडदा पडला. नक्षल विरोधी अभियानाकडून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी शुक्रवारी प्राणहिता (अहेरी) मुख्यालयात जाऊन सुरक्षेच्या संबंधाने माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या संबंधाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगस्फोटबाबतही संबंधितांशी चर्चा करून नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख उत्तर देणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. शेलार म्हणतात... आपले वरिष्ठ या संबंधाने बोलल्यामुळे आपल्याला आता या विषयावर काही बोलणे योग्य होणार नाही, असे महानिरीक्षक शेलार म्हणाले. मात्र, आपली प्रकृती हेलिकॉप्टरमध्ये बिघडली आणि नंतर हेलिकॉप्टर खाली उतरवले, असे जर कुणी म्हणत असेल तर ते निखालस खोटे आहे. आपण हेलिकॉप्टरमध्ये बसलोच नाही. दुसरे म्हणजे, हेलिकॉप्टर येथून उडले ते थेट गडचिरोलीलाच उतरले. आपली प्रकृतीही ठणठणीत आहे. त्याचमुळे वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडून आपण शुक्रवारी भल्या सकाळी गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्यावर गेलो. यापेक्षा जास्त काही बोलणे योग्य होणार नसल्याचेही शेलार म्हणाले.
आयजींच्या न झालेल्या हेलिकॉप्टर वारीवर पडदा
By admin | Published: May 13, 2017 2:50 AM