लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात प्रलंबित मागण्यांवरून निर्माण झालेला वाद सुटण्याची चिन्हे दिसत नाही. हा वाद साेडविण्यासाठी अप्पर कामगार आयुक्तांनी यात हस्तक्षेप करणे गरजेचे हाेते. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून त्यांची बैठक लावण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आराेप कामगारांनी केला आहे.
हा वाद नांदा-कोराडी (ता. कामठी) येथील साक्षी बिस्किट कंपनीतील आहे. या कंपनीत अंदाजे ३०० कामगार कार्यरत असून, त्यांच्याकडून काेराेना संक्रमण काळात रोज किमान १२ तास काम करवून घेण्यात आले. या काळात काेराेनाची लागण झाल्याने संघपाल काेलते नामक कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नीला कंपनी व्यवस्थापनाने कंपनीच्या सेवेत सामावून घ्यावे, कंपनी नागपूर महानगरापासून २० किमीच्या परिघात असल्याने या कामगारांना परिमंडळ १ चा पगार लागू करावा आदी प्रमुख मागण्या कामगारांनी रेटून धरल्या.
या कामगारांना न्याय मिळावा म्हणून महादुल्याचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी यात हस्तक्षेप केला. त्यांनी हा वाद अप्पर कामगार आयुक्त यांची बैठक बाेलावून निकाली काढावा, अशी सूचनाही कंपनी व्यवस्थापनाला केली. ही बैठक आयाेजित करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याची माहिती कामगार प्रतिनिधींनी दिली. याबाबत त्यांनी अप्पर कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रारही केली. दुसरीकडे, कामगारांच्या समस्यांवर वेळीच ताेडगा न काढल्यास आंदाेलन करण्याचा इशाराही नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी दिला.
...
कामगार संतप्त
ही समस्या मार्गी लावण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी गुरुवारी (दि. २४) बैठक बाेलावण्यात येणार असल्याची माहिती अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगार प्रतिनिधींना देण्यात आली हाेती. वास्तवात, ही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे कामगारांच्या प्रतिनिधींनी अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली. मात्र, यासंदर्भात असंबद्ध उत्तरे देण्यात आल्याचा आराेप कामगार प्रतिनिधींनी केला आहे. या प्रकारामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त हाेत आहे.
...
ही समस्या साेडविण्यासाठी गुरुवारी (दि. २४) बैठक बाेलावण्यात आली हाेती. समन्वयाच्या अभावामुळे ही बैठक हाेऊ शकली नाही. कामगारांना न्याय मिळावा, हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी बुधवारी (दि. ३०) कंपनी व्यवस्थापन व कामगार यांची बैठक बाेलावण्यात आली आहे.
- राजदीप धुर्वे,
अप्पर कामगार आयुक्त, नागपूर.