योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील तीन वर्षांपासून विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा चित्र बदलले आहे. २०१८-२० च्या या चौथ्या ‘बॅच’मध्ये विद्यार्थिनींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्थापनेपासून प्रथमच ‘आयआयएम’मध्ये विद्यार्थिनींची संख्या ही २० टक्क्यांच्यावर गेली आहे हे विशेष.केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे घोषणा झाल्यानंतर सर्वात वेगाने ‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग २०१५ मध्ये प्रत्यक्षात सुरू झाले. देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे संस्थेचे पालकत्व देण्यात आल्याने व देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने विद्यार्थिनींची संख्या जास्त असेल असा अंदाज होता. मात्र पहिल्या वर्षीपासून विद्यार्थिनींची संख्या कमीच दिसून आली. पहिल्या वर्षी संस्थेत ‘पीजीपी’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेन्ट) या अभ्यासक्रमात केवळ तीन विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. एकूण प्रवेशांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ ५.६६ टक्के होती.मागील वर्षी तर एकूण प्रवेश क्षमतेच्या केवळ ३ टक्के व झालेल्या प्रवेशांच्या तुलनेत ३.५० इतकी विद्यार्थिनींची टक्केवारी होती. मागील चार वर्षात विद्यार्थिनींची सर्वाधिक टक्केवारी २०१६ च्या ‘बॅच’मध्ये दिसून आली.एकूण प्रवेशांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या तेव्हा १२.९६ टक्के इतकी होती.यंदा ‘आयआयएम-नागपूर’मध्ये १११ विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रवेश झाले. यातील ७८ टक्के जागांवर विद्यार्थी तर २२ टक्के जागांवर विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या जागांमध्ये १८.४९ टक्के वाढझाली आहे.
आणखी प्रयत्नांची आवश्यकता‘आयआयएम-अहमदाबाद’सह विविध ‘आयआयएम’मध्ये काही वर्षांपूर्वी विद्यार्थिनींची संख्या फारच कमी होती. मात्र ही टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘आयआयएम-नागपूर’मध्ये मागील वर्षीपासून याबाबत पुढाकार घेण्यात आला. मात्र ही संख्या आणखी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे. दरम्यान, ‘आयआयएम-नागपूर’कडून भविष्यात काय पुढाकार घेण्यात येतील, याबाबत ‘आयआयएम-अहमदाबाद’चे ‘कम्युनिकेशन मॅनेजर’ दीपक भट यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.