लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कष्ट आणि ध्यासाच्या बळावर शून्यातून १५० कोटींचा व्यवसाय उभारणारे एकेकाळचे आॅटोचालक प्यारे खान यांच्या कार्याची दखल ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट’(आयआयएम) अहमदाबाद संस्थेने घेतली. जिथे दोनवेळच्या भाकरीसाठी झगडावे लागायचे त्याच घराच्या अंगणात १२५ ट्रेलरचा ताफा उभा करणाऱ्या प्यारेच्या संघर्षाला ‘एम पॉवर वॉर रुम’ पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्काराच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ३७० व्यावसायिकांमधून प्यारेची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, प्यारेच्या व्यवसायाचा अभ्यास आयआयएम, अहमदाबाद यासारखी संस्था करणार आहे.प्यारेचे आज दिसणारे हे यश सहजासहजी मिळाले नाही. प्रचंड मेहनतीच्या भरवशावर मिळविले. सुरुवातीच्या दिवसांत भाकरीचा संघर्ष अनुभवत असताना आईचे दागिने विकून प्यारेने आॅटो विकत घेतला. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून तो चालवला. हाती आलेल्या दोन-चार पैशांच्या बळावर मोठी झेप घेतली. प्रतिकूलतेच्या वादळांनी वाट अडवली खरी, पण स्वत:वरचा विश्वास ढळू दिला नाही. अभावातून प्रभाव निर्माण करणारा हाच माणूस दीडशे कोटीच्या व्यवसायाचा मालक ठरला. प्यारेच्या जिद्दीची ही यशोगाथा क्षणिक पराभवाने खचून जाणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणावाट ठरेल अशीच आहे. या यशोगाथाचा अभ्यास करीत ‘आयआयएम’ने पुरस्कृत केले.माल वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांच्या या पुरस्काराच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुरुवातीला प्यारेने नकार दिला होता. मात्र त्यांच्याकडे काम करणाऱ्या ‘वसीम’ला ही बाब आवडली नव्हती. त्याने न सांगता अर्ज भरून पाठवूनही दिला. नंतर हा पुरस्कार किती मोठा आहे, हे समजावून सांगण्यास त्याला दोन दिवस लागले. ‘लोकमत’शी बोलताना प्यारे म्हणाला, हा पुरस्कार प्रतिष्ठेचा, सहभागी स्पर्धकांनी कित्येक महिन्यांपासून तयारी चालवली होती. यामुळे आपण पहिल्याच फेरीत बाद होऊ, हा अंदाज बांधला होता. परंतु पहिल्याच फेरीत कष्टाने उभारलेला माझा व्यवसाय परीक्षकांच्या पसंतीस उतरला. माझ्यासह १७ स्पर्धकांची निवड ‘वॉर रुम’साठी केली. यात ‘एमबीए’, ‘इंजिनीअर’ व उच्चशिक्षित स्पर्धक होते. त्यांनी ‘लॅपटॉपवर’ मुद्देसूद व्यवसायाची माहिती, पॉवर प्रेझेन्टेशन तयार केले होते.मी बारावी नापास, इंग्रजीचा फारसा गंध नसलेला, साधा लॅपटॉपही आणला नव्हता. मात्र व्यवसायाचे नियोजन आणि प्रगती हे सोप्या भाषेत मांडले. त्यांना ते पटले. शेवटच्या फेरीत निवड केली. सहास्पर्धकांचीही फेरी घाम फोडणारी होती. कारण परीक्षक स्पर्धकांची चूक काढत होते. माझी वेळ आली तेव्हा त्यांनी पाच प्रश्न विचारले. ‘व्यवसाय कसा केला जातो’ या प्रश्नाला हृदयातून उत्तर दिले. निकालाची घोषणा झाली. माझ्या कष्टाला आणि प्रामाणिकतेला प्रथम पुरस्कार मिळाल्याचे ऐकून स्तब्ध झालो. परीक्षकांमधील एका सद्गृहस्थाने हा पुरस्कार व्यक्ती, शिक्षणाला पाहून नाही तर व्यवसायाच्या नियोजनाला दिला जातो, असे सांगितले. मी भानावर आलो. आयआयएम बंगळुरूचे संचालक प्रा. रघुराम यांनी हा पुरस्कार दिला. यावेळी परीक्षक वृंदा जहागीरदार, दवे, प्रा. अरविंद साय, प्रा. अमित कर्मा, प्रा. सोबेश अग्रवाला, प्रा. विश्वनाथ पिंगाली आदी उपस्थित होते. हा पुरस्कार माझा नाही नागपूरकरांचा आहे, असे प्यारे मोठ्या अभिमानाने सांगतो. प्यारेच्या जिद्दीची यशोगाथा सर्वप्रथम ‘लोकमत’ने ‘आॅटोचालकाने उभारला दीडशे कोटींचा व्यवसाय’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती, हे विशेष.