नागपूर : आयआयटी बनारसच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना एमआयडीसी ठाण्यांतर्गत वानाडोंगरीच्या सातपुडे ले-आऊटमध्ये घडली. पुष्पक ललित संभे (२१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पुष्पक आयआयटी बनारसमध्ये तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता.
पुष्पक काही दिवसांपूर्वी आईवडिलांकडे आला होता. त्याचे वडील एका कंपनीत तर आई सूतगिरणीत काम करते. ते मूळचे धामणगाव रेल्वे येथील रहिवासी आहेत. ते पाच दिवसांपूर्वी महालक्ष्मी पूजनासाठी पुष्पकसोबत धामणगाव रेल्वे येथे गेले होते. गुरुवारी पुष्पकचे ऑनलाईन डिस्कशन होते. त्यासाठी तो गुरुवारी सकाळी नागपूरला पोहोचला. सकाळी ११ वाजता त्याचे आईसोबत बोलणे झाले. त्यानंतर पुष्पक अभ्यासात व्यस्त असल्याचे समजून आईने फोन केला नाही. दुपारी ३ वाजता आईने पुष्पकला फोन केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. खूप प्रयत्न करूनही पुष्पक उत्तर देत नसल्याचे पाहून त्याच्या आईने शेजारच्यांना फोन केला. त्यांना घरी जाऊन पुष्पकसोबत बोलणे करून देण्यास सांगितले. परंतु शेजाऱ्यांना घराचे दार बंद दिसले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता पुष्पक फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याची सूचना दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दार तोडून पुष्पकला खाली उतरविले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता.
हुशार अन् एकुलता एक
- पुष्पक हुशार विद्यार्थी होता. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे कोणाशी अधिक बोलणे किंवा मैत्री नव्हती. त्याने अचानक आत्महत्या केल्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केल्यानंतर त्याच्या आत्महत्येचे कारण समजण्याची शक्यता आहे. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
................