नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील स्टार्टअप 'सायबर सेक्युरिटी'ला आयआयटी कानपूरची साथ मिळाली आहे. आयआयटी कानपूरने निवड केल्याने विद्यापीठातील स्टार्टअपला संपूर्ण देशात ओळख मिळणार आहे. तब्बल २५ हजार अर्जांमधून आयआयटी कानपूरने या स्टार्टअपची निवड केली आहे. सायबर ईरा (cyber 3ra) अशा या नवीन स्टार्टअपने संगणकीय ऑनलाइन नेटवर्क प्रणालीच्या सुरक्षेचा विडा उचलला आहे.
झारखंड राज्यातील रांची येथील मूळ निवासी असलेला आदर्श कांत या विद्यार्थ्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित नागपूर येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आदर्श कांत या विद्यार्थ्याने व्हिएनआयटी नागपूर येथील लक्ष्मीधर गावपांडे यांच्यासोबत सायबर सिक्युरिटी स्टार्टअप सुरू केले.
आदर्श व लक्ष्मीधर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंक्युबॅशन केंद्रामध्ये 'सायबर सिक्युरिटी (cyber 3ra) ही नवीन संगणकीय सुरक्षा प्रणाली विकसित केली. सद्यस्थितीत सर्वच क्षेत्रांमध्ये ऑनलाईन सुविधा दिल्या जात आहे. यामध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहारावर सायबर हल्ला होण्याची अधिक शक्यता असते. सायबर हल्ल्याचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने सायबर सिक्युरिटी ही प्रणाली उपयुक्त ठरणारी असल्याचे आदर्श कांत याचे म्हणणे आहे. सायबर सुरक्षा प्रकारातील ही नवीन प्रणाली विकसित करण्याकरिता विद्यापीठाच्या इनक्युबॅशन केंद्राची स्टार्टअपला मदत मिळाली.
देशात सर्वात मोठी सायबर आर्मी
सरकारी तसेच विविध आस्थापनांवर होणारे सायबर हल्ले लक्षात घेता देशात सर्वात मोठी सायबर आर्मी निर्माण केली जात आहे. सायबर ईरा या प्रणाली अंतर्गत देखील देशभराच्या विविध भागातील तब्बल १२०० इथिकल हॅकर्स सुरक्षेच्या दृष्टीने काम करणार आहे.
सायबर सेक्युरिटीचे प्रशिक्षण
सायबर सेक्युरिटी या स्टार्टअपने पिनॅकल, टेली सर्विसेस, ग्लोबल एज्युकेशन आदी कंपन्यांसोबत काम केले आहे. सोबतच या स्टार्टअपने रिझर्व बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, सीआरपीएफ, ऑर्डनन्स फॅक्टरी आदी आस्थापनांना सायबर सुरक्षेबाबत आधुनिक प्रशिक्षण दिले आहे.