योगेश पांडे, नागपूर : नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध सिलिंडर विक्रीच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून ३७ भरलेले सिलिंडर्स जप्त केले. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने ही कारवाई केली.शहरातील अनेक भागात अवैध सिलिंडर विक्रीचे रॅकेट चालते.
सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांकडून घरगुती वापराचे सिलिंडर्स घेतले जातात. त्यानंतर अवैधपणे एका मशीनच्या सहाय्याने लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येतो. यात मोठा धोका असतो व अपघात झाल्यास आजुबाजुच्या भागाचे मोठे नुकसान होण्याची भिती असते. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरपूर मार्गावरील प्लॉट क्रमांक १३ वरील भवानी डेव्हलपर्स येथील गोदामात अवैध सिलिंडर्स विक्री सुरू असल्याची गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी तेेथे धाड टाकली. अमित शिवशंकर शाहू (२४, मिनीमाता नगर, कळमना) हा घरगुती वापराच्या सिलिंडरमधून दिल्ली मेड लहान सिलिंडरमध्ये मशीनच्या सहाय्याने गॅस भरत असताना आढळला.
पोलिसांनी गोदामातून ३७ भरलेले दिल्लीमेड सिलिंडर्स, ३४ रिकामे सिलिंडर्स, घरगुती वापराची एचपी कंपनीची दोन सिलिंडर्स व गॅस भरण्याची मशीन असा १.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने सिलिंडर्सची काळाबाजारी करत असल्याचे कबुल केले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.