लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : स्वत:च्या घरी देशी दारू बाळगून त्याची अवैध विक्री करणाऱ्या एका आराेपीस कुही पाेलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून ४३६८ रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई कुही शहरातील गणेश चाैक परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शेख अकरम शेख जुमन छवारे (५१, रा. वाॅर्ड क्र. ९, गणेश चाैक, कुही) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. शहरातील गणेश चाैक परिसरातील एका घरी देशी दारूची अवैध विक्री केली जात असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी परिसरात पाहणी करीत आराेपीच्या घरी धाड टाकली. घराची झडती घेतली असता, एका बाॅक्समध्ये १८० मिलिच्या ७२ बाटल्या तसेच एका पिशवीमध्ये ९० मिलिच्या २४ बाटल्या भिंगरी संत्रा नं. १ देशी दारू आढळून आली. पाेलिसांनी आराेपीस ताब्यात घेत त्याच्याकडून ४३६८ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली.
कुही पाेलिसांनी याप्रकरणी कलम ६५ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक कमलेश साेनटक्के यांच्या नेतृत्वात पाेलीस अंमलदार जनार्दन काटे, अमाेल झाडे, सुनील बेलखाेडे यांच्या पथकाने केली.