नागपूर : घाट रोडवरील रजत प्लाझाला लागून असलेल्या बदामाच्या दोन झाडांची छटाई न करता कापून टाकण्यात आले. रस्त्यावरील दुकानदारांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून झाडांची अवैध कत्तल केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांचा आहे. रजत प्लाझा येथील स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या धंतोली झोनमध्ये तक्रार केली आहे.
बऱ्याच वर्षांपासून अपार्टमेंटला लागून बदामाचे व अन्य वृक्ष होते. या झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर लटकत होत्या. पावसाळ्यात झाडांच्या फांद्यांमुळे विजेचा अडथळा होऊ नये म्हणून फांद्या कापण्यास नागरिकांचा नकार नव्हता. परंतु वीज कर्मचाऱ्यांनी फांद्या न कापता झाडच कापून टाकल्याने नागरिक संतप्त झाले. लोकांनी झाडे कापण्याला विरोधही केला. मनपा उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
- वीज विभागाला दिली नोटीस
घटनास्थळावर पोहचलेले मनपाच्या उद्यान विभागाचे मोहरील व संदीप सेलोकर यांनी सांगितले की, वीज विभागाने झाडे कापण्याची परवानगी घेतली नव्हती. आवश्यकतेनुसार त्यांनी झाडाच्या फांद्या कापणे गरजेचे होते. परंतु त्यांनी झाडे कापल्याने आम्ही वीज विभागाच्या गणेशपेठ सबस्टेशनच्या कर्मचाऱ्यांविरोधात नोटीस बजावली आहे.