वर्षभरात ६ लाखांचे १९ लाख उकळले - आणखी पाच लाखांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच लाख ८० हजारांच्या बदल्यात वर्षभरात १९ लाख रुपये उकळल्यानंतरही पुन्हा पाच लाखांसाठी वेठीस धरणाऱ्या अवैध सावकाराविरुद्ध पाचपावली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. संतोष ऊर्फ राहुल मुरलीधर ठाकूर (वय ३५) असे आरोपी सावकाराचे नाव आहे. तो अशोक चौक, पाचपावलीतील दुर्गा मंदिराजवळ राहतो.
फिर्यादी संतोष सेवकराम आहुजा (वय ३३) हे आहुजानगरातील रहिवासी असून त्यांचे गांधीबागमध्ये मेडिकल स्टोअर्स आहे. व्यवसाय तसेच वडिलांच्या उपचारासाठी त्यांना पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये आरोपी राहुल ठाकूर याच्याकडून ५ लाख ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते. महिन्याला १५ टक्के व्याज ठरले होते. त्यानुसार, आतापावेतो आहुजा यांनी ठाकूरला १८ ते १९ लाख रुपये दिले. तरीसुद्धा आणखी पाच लाख रुपयांचा हिशेब काढून ते वसूल करण्यासाठी ठाकूरने आहुजांना वेठीस धरले होते. रक्कम देण्यास उशीर झाल्यास आरोपी त्यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे आहुजा दहशतीत आले होते. त्यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी राहुल ठाकूर याच्याविरुद्ध सावकारी कायदा ४४, ४५ कलम ३८६, ५०६ (ब), २९४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली.
----
अनेकांकडून वसुली
आरोपी राहुल ठाकूर याने अशा प्रकारे अनेकांकडून वसुली केली असून वरिष्ठांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास ठाकूरकडे दुसऱ्याची मालमत्ता बळकावण्याची अनेक कागदपत्रे मिळू शकतात.
----