लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : अवैध दारू विक्री आणि अवैध दारू विक्रेत्यांची अरेरावी यामुळे येरला येथील महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. अवैध दारू विक्रेत्यांनी तरुणांना मारहाण केल्याने या महिलांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरांना घेराव करीत त्यांच्या माेटरसायकली जाळल्या हाेत्या. त्यातच या महिलांनी पुढाकार घेत नजीकच्या गाेन्ही येथील अवैध दारू विक्रेत्यास पाेलिसांच्या ताब्यात दिले. पाेलिसांनी त्याच्या घरातून एकूण १२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
इसाक मोहम्मद सय्यद ऊर्फ शेख रा. गोन्ही, ता. नागपूर ग्रामीण व देवशंकर चमरू वर्मा, रा. येरला, ता. नागपूर ग्रामीण अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. ताे गाेन्ही येथे अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती महिलांना मिळाली हाेती. त्यामुळे महिलांनी याबाबत कळमेश्वर पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच धाड टाकून त्याच्या घराची झडती घेतली. त्यात त्याच्या घरात देशीदारूच्या २४० बाटल्या आढळून आल्याने पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
याच पथकाने महिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे येरला येथील देवशंकर चमरू वर्मा याच्या घरी धाड टाकून झडती घेतली. त्यावेळी देवशंकर हा गांजा ओढत हाेता. पाेलिसांनी त्यालाही ताब्यात घेत अटक केली. या दाेन्ही आराेपींकडून पाेलिसांनी एकूण १२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक मुंडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.