लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : पाेलिसांनी ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर कुही परिसरातील किन्ही फाट्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाहन आणि १९ पेट्या दारू असा एकूण तीन लाख ५९ हजार ५२८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी पहाटे करण्यात आली.
भाऊराव दत्तू खेडकर (वय ३९), सुधाकर तुलाराम चाचेरकर (३२) व मुकुंदा हरिभाऊ दूधपचारे (३५) (तिघेही रा. कुही) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर दारूची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत असल्याने पाेलिसांनी दारूच्या अवैध वाहतूक व विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच कुही पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मांढळ परिसरातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी किन्ही फाटा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली.
यात पाेलिसांनी मांढळच्या दिशेने जाणारे एमएच-४९/सी-४२०९ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली. त्यात त्यांना देशी दारूच्या १९ पेट्या ठेवल्याचे आढळून आले. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनातील तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचे वाहन, ४७,५२८ रुपये किमतीची दारू आणि १२ हजार रुपये किमतीचे दाेन माेबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख ५९ हजार ५२८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिली. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक कमलेश साेनटक्के व उपनिरीक्षक अनिल देरकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. या प्रकरणी कुही पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.