लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पाेलिसांनी खापरखेडा-काेराडी मार्गावर कारवाई करीत देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून दारू व वाहन असा एकूण ५५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.२७) मध्यरात्री करण्यात आली.
राेशन तुकाराम वंजारी (३७, नांदिखेडा, ता.कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. रविवारी (दि.२८) हाेळी असल्याने पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली हाेती. शिवाय, दारूची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर नजर ठेवली हाेती. त्यातच खापरखेडा-काेराडी मार्गावरून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांनी या मार्गावर नाकाबंदी केली हाेती. यात पाेलिसांनी एमएच-४०/सीबी-५२८५ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने जात असलेल्या राेशन वंजारी याला थांबवून त्याची झडती घेतली.
त्याच्याकडे देशी दारूच्या ९६ बाटल्या आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. ती देशी दारूची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्याला अटक केली आणि त्यांच्याकडून ॲक्टिव्हा आणि दारू जप्त केली. या कारवाईमध्ये ५० हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा आणि ५,७६० रुपये किमतीची दारू असा एकूण ५५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी दिली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस हवालदार उमेश ठाकरे, आशिष भुरे, दिलीप पटले, नुमान शेख, अलीम खान यांच्या पथकाने केली.