लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरखेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. टुले आणि वनपाल जे.एस. उके यांचे निलंबन करण्यात आले आहे. या सोबतच अन्य चार वनपालांच्या आणि दोन गार्डच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अवैध वृक्षतोड, मृताच्या नावे खसरा, वनक्षेत्रामध्ये उत्खनन यासह अनेक गंभीर आरोप निलंबित अधिकाऱ्यांवर आहेत. चार वनपाल आणि दोन गार्डची बदलीही अशाच स्वरूपांच्या तक्रारींवरून करण्यात आल्याची माहिती आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. टुले नरखेड वन विभागात कार्यरत होते. मागील पाच-सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन एसीएफ दर्जाच्या अधिकाºयाकडून या सर्व तक्रारींची चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पी.कल्याणकुमार यांनी दिली. ते म्हणाले, निलंबन काळात टुले यांना मुुख्यालय उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या काळात त्यांची विभागीय चौकशी केली जाणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.टुले यांच्यासंदर्भात मागील तीन महिन्यांपासून चौकशी सुरू होती. या चौकशीत अनेक नवनवे मुद्दे येत गेले. त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध वृक्षतोडीसारख्या गंभीर घटना घडूनही दखल न घेतल्याचे चौकशीत पुढे आले. यासह अन्य सर्व चौकशीत ते दोषी आढळल्याने पी.कल्याणकुमार यांनी बुधवारी हे आदेश दिले.यासोबतच, वनपाल जे. एस. उके यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी बुधवारी हे आदेश काढले. निलंबनाच्या काळात त्यांना मुख्यालय, वन परिक्षेत्र अधिकारी पारशिवनी येथे रुजू व्हावे लागणार आहे. शुक्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उके यांच्याविरोधात बऱ्याच तक्रारी होत्या. वनक्षेत्रात उत्खनन, खसरा प्रकरणात घोटाळा यासह अनेक मुद्दे चौकशीमध्ये आले. त्यात दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यांचीही विभागीय चौकशी केली जाणार आहे. यासोबतच चार वनपाल आणि दोन गार्डच्याही तातडीने बदल्या करण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांविरोधातही तक्रारी होत्या, अशी माहिती त्यांनी दिली.
नरखेडच्या आरएफओंना अवैध वृक्षतोड आणि गैरप्रकार भोवले : निलंबनाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:39 PM
नरखेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. टुले आणि वनपाल जे.एस. उके यांचे निलंबन करण्यात आले आहे. या सोबतच अन्य चार वनपालांच्या आणि दोन गार्डच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देवनपालही निलंबित, अन्य चार वनपालांसह दोन गार्डच्या बदल्या