लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिवापूर तालुक्यातील सरांडी येथील शेतकरी रोशन काशीनाथ येले (३३) यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा सावकार प्रमोद लाला भोयर (३४) याला सत्र न्यायालयाने मंगळवारी भादंविच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. आरोपी हेवती, ता. उमरेड येथील रहिवासी आहे.
याशिवाय आरोपीला भादंविच्या कलम ५०६ (ठार मारण्याची धमकी देणे) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रहिमत के. शेख यांनी हा निर्णय दिला. आरोपी भोयर सावकारी प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो गरीब शेतकऱ्यांना व्याजाने कर्ज देत होता व त्या मोबदल्यात त्यांच्या जमिनीचे विक्री करार स्वत:च्या नावाने लिहून घेत होता. मयत येले यांनीही भोयरकडून ५० हजार रुपयाचे कर्ज घेऊन १ मार्च २०१८ रोजी त्याच्यासोबत ६ लाख २५ हजार रुपयात पाच एकर जमीन विकण्याचा करार केला होता. त्यानंतर येले यांनी भोयरला ६० हजार रुपये स्वीकारून जमीन विक्री करार रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, भोयरने करार रद्द करण्यास नकार दिला. त्याला येले यांची जमीन बळकावायची होती. तसेच, त्याने येले यांना ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे सुमारे १८ लाख रुपये किमतीची जमीन अत्यंत कमी रकमेत गमावण्याच्या चिंतेपोटी येले यांनी १३ मार्च २०१८ रोजी रात्री मौजा खैरगाव शिवारातील माटे यांच्या शेतामध्येच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
सरकारने १२ साक्षीदार तपासले
सरकारने आराेपी भोयरविरुद्ध न्यायालयात १२ साक्षीदार तपासले. भोयरने कर्ज देऊन जमीन बळकावलेल्या चार शेतकऱ्यांचा या साक्षीदारांमध्ये समावेश होता. त्यांनीही भोयरविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणात साक्ष देण्यासाठी ते स्वत:हून पुढे आले होते. त्यामुळे भोयरवरील आरोपांना बळकटी मिळाली. मयत येले यांची पत्नी बेबी यांच्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांनी १७ मार्च रोजी भोयरविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. तसेच, त्याला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपीच्यावतीने ॲड. डी. आर रुपनारायण तर, सरकारच्यावतीने ॲड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक के. जे. वैरागडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर तराळे, नत्थू इवनाते, भवानीप्रसाद मिश्रा, हेडकॉन्स्टेबल मनोज तिवारी, सुनील डोंगरे, खडसे, मृणाली चाके यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.
कुटुंबाचा आधार गमावला
राेशन येले यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार गमावला गेला. त्यांचे कुटुंब संकटाच्या खाईत ढकलले गेले. येले यांना मुलगी इशिका (९) व मुलगा इशांत (६) अशी दोन अपत्ये आहेत. वडील काशीनाथ यांनी मुले मयत रोशन व कृष्णा यांना प्रत्येकी ५ एकर शेती वाटप करून दिली होती. शेती कसण्यासाठी रोशन यांनी घटनेच्या ६-७ महिन्यापूर्वी ट्रॅक्टरही खरेदी केला होता. परंतु, भाेयरमुळे या कुटुंबाचे सुखी भविष्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.