लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवरील मिडास हाईट्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह इतर विविध संस्थांची स्वत:च्या पार्किंगची जागा खूपच कमी आहे. यामुळे बहुसंख्य लोकांना आपली वाहने फुटपाथवर व रस्त्यावर उभी करावी लागतात. यातच ऑटोरिक्षा, हातठेले व चहाटपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता व्यापला जातो. परिणामी, या मार्गाने वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. येथील अवैध पार्किंगकडे वाहतूक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे अपघात झाल्यावरच लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मेडिकल हब म्हणून रामदासपेठच्या परिसराची ओळख आहे. येथे विदर्भच नाही तर मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णवाहिकांची वर्दळ असते. जवळचा बजाजनगर हा उच्चभ्रू वस्ती म्हणून गणला जाणारा परिसर. या महत्त्वाच्या वस्त्यांना जोडणारा सेंट्रल बाजार रोड मात्र प्रचंड अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. विशेषत: मिडास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकडे स्वत:ची पार्किंगची सोय आहे. परंतु त्यांच्याच स्टाफच्या वाहनांनी ही पार्किंग फुल्ल होते. येथे येणाऱ्यांना चक्क फुटपाथवर दुहेरी रांगेत दुचाकी वाहने उभी करावी लागतात. तर रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जातात. यात मध्येच ऑटोस्टॅण्डसाठी जागा देण्यात आली आहे. काही ऑटो रांगेत तर काही रस्ता रोखून उभे असतात. फुटपाथ आणि रस्त्यावर हातठेल्यांचे अतिक्रमण राजरोसपणे कायम असते. येथे दोन-तीन महिन्यातून एखाद्यावेळी अतिक्रमणावर कारवाई होते, परंतु अतिक्रमण विरोधी पथकाची पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमण होते. अवैध पार्किंगवर मात्र कारवाई होताना दिसून येत नाही. यामुळे रस्त्यावर वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
१०० फुटांचा रस्ता ३० फुटांवर
सेंट्रल बाजार रोडच्या अर्ध्या भागात सिमेंट रस्त्याचे काम झाले, तर उर्वरित रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याचे डांबरीकरणही उखडल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यातच फुटपाथ व रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे १०० फुटांचा रस्ता ३० फुटांवर येतो. यातच कोणी चारचाकी वाहनांची दुहेरी पार्किंग केल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होते. दिवसभरात १०० वेळा तरी वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार होतात. इमर्जन्सीमध्ये आलेल्या रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहचण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रचंड अव्यवस्था असलेल्या या मार्गावर सर्जिकल स्ट्राईकची गरज आहे. मात्र ही कारवाई करण्याची हिंमत करणार कोण, हा प्रश्न आहे.
रुग्णालयांच्या पार्किंग मोठी समस्या
सेंट्रल बाजार रोडवर लहानमोठी अनेक रुग्णालये आहेत. मात्र या रुग्णालयांमध्ये पार्किंगसाठी योग्य व्यवस्था नाही. बहुसंख्य हॉस्पिटलचे पार्किंग रस्त्यावरच केले जाते. फुटपाथ तर असून नसल्यासारखा आहे.
फुटपाथवर दुचाकींचे दुहेरी पार्किंग
या रस्त्यावर फुटपाथ निर्माण केले की नाही, असा प्रश्न पडावा इतका अतिक्रमणाने व्यापलेला आहे. मिडास हाईट्ससह इतर संस्थांच्या इमारतीसमोरील फुटपाथ दुचाकींनी व्यापलेले असतात. विशेष म्हणजे, दुहेरी पार्किंग केली जाते. यामुळे येथील फुटपाथ इमारतींचाच भाग असावा अशी अवस्था आहे. पादचाऱ्यांसाठी कुठेही जागा शिल्लक दिसत नाही. हा प्रकार सेंट्रल बाजार रोडच्या दोन्ही बाजूला सारखाच आहे.