लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : अनैतिक शरीरसंबंधातून गर्भधारणा हाेणे आणि चाेरूनलपूर गर्भपात करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. त्यासाठी लागणारी कीट मेडिकल स्टाेअर्सवाले डाॅक्टरांच्या चिठ्ठीऐवजी विकत नाहीत. वाडी शहरात या कीटची अवैध विक्री केली जात असल्याची मिळताच पाेलिसांनी त्या मेडिकल स्टाेअर्सवर धाड टाकली आणि मालकास कीट विकताना रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. २३) करण्यात आली.
धनंजय नामदेवराव गुहे (३९, रा. शिवशक्तीनगर, वाडी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी दुकानदाराचे नाव आहे. त्याचे दत्तवाडी येथील दत्ता काॅम्प्लेक्समध्ये धन्वंतरी औषधालय ॲण्ड जनरल स्टोअर्स नामक औषधांचे दुकान आहे. ताे गर्भपात कीटची डाॅक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्री करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी बनावट ग्राहकास त्याच्या दुकानात पाठविले.
त्याने धनंजय गुहे यास कीटची मागणी केली. त्याने डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याला ती कीट दिली. शिवाय, त्या कीटचे बिलही दिले नाही. हा व्यवहार हाेत असताना बनावट ग्राहकाने पाेलिसांना सूचना केली आणि परिसरात दबा धरून बसलेल्या पाेलिसांनी लगेच धाड टाकून दुकानदारास ताब्यात घेत अटक केली. माहिती मिळताच अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या निरीक्षक माेनिका धवड यांच्या सूचनेवरून अन्न सुरक्षा अधिकारी यदुराज दहाताेंडे सहकाऱ्यांसह दुकानात दाखल झाले.
त्यांनी दुकानांची बारकाईने तपासणी केली असता, त्या दुकानातून बऱ्याच दिवसापासून गर्भपाताची कीटची अवैध विक्री केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून विकलेले साहित्य व १,५०० रुपये राेख जप्त केले. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि १८८, औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा कलम १८ अ, ब, क अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक साजिद अहमद यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.