लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : किराणा दुकानातून देशी दारूची चाेरूनलपून विक्री केली जात असल्याचा प्रकार काेराडी (ता. कामठी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे साेमवारी (दि. २१) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. पाेलिसांनी माहिती मिळताच त्या दुकानावर धाड टाकली आणि दुकानदाराविरुद्ध गुन्हा नाेंदवित त्याच्याकडून ११ हजार ३९५ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली.
विनोद माटे, रा. महादुला, ता. कामठी असे आराेपी दुकानदाराचे नाव आहे. विनाेदचे महादुला येथे किराणा दुकान आहे.ताे या दुकानातून देशी दारूची अवैध विक्री करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने दुकानावर धाड टाकून कसून झडती घेतली. त्यांना दुकानात देशी दारूच्या २३३ बाटल्या आढळून आल्या. दुकानदार अवैधरीत्या देशी दारूची विक्री करीत असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दुकानदाराविरुद्ध गुन्हा नाेंदवून दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या कारवाईमध्ये ११ हजार ३९५ रुपये किमतीची दारू जप्त केली, अशी माहिती पाेलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. याप्रकरणी काेराडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक इजराईल शरीफ, गोपाल वैद्य, सुरेश बर्वे, सुभाष वासाडे, अनिल जाधव, सुनिता साखरे यांच्या पथकाने केली.