कुही : तालुक्यातील मांढळसह अन्य गावांमध्ये देशी दारूची माेठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जात आहे. काही गावांमध्ये एकही परवानाधारक दुकान नाही. मात्र, त्या गावांमध्ये पाहिजे तितकी दारू सहज उपलब्ध होते. या अवैध दारूविक्रीमुळे नागरिक वैतागले आहेत. शिवाय, महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
काही गावांमधील परवानाधारक दारूचे दुकान बंद करण्यात यापूर्वी महिलांना यश आले होते. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने गावात देशी दारूचे दुकान सुरू करण्यास परवानगी दिली नाही. मात्र, हळूहळू अवैध दारूविक्रीला उधाण येऊ लागले. अलीकडच्या काळात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढल्याने गावातील गल्लीबोळांत देशी दारू विकत मिळू लागली आहे. ज्या ठिकाणी दारूची विक्री केली जाते, त्या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची दिवसभर वर्दळ असते. यातून गुन्हे घडत असल्याने या दारूविक्रीला कायमचा आळा घालावा, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे.