लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : माेवाड हे नरखेड तालुक्यातील नगरपालिका असलेले शहर असून, या शहरात मागील काही महिन्यांपासून अवैध व खुलेआम दारूविक्रीला उधाण आले आहे. दारू पिणारी मंडळी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन न करता गर्दी करीत असल्याने त्यांचा हलगर्जीपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत आहे.
काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यातही माेवाड शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वी शहरातील वैध व अवैध दारूविक्री नियंत्रणात हाेती. शासनाने टाळेबंदी उठवल्यानंतर सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानंतर शहरात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढत गेले. दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने काही काळ बंद ठेवण्याचे व याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते.
वास्तवात या काळात शहरातील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. मात्र, वाॅर्ड क्रमांक-११ मध्ये अवैध दारूविक्री जाेरात सुरू हाेती. विशेष म्हणजे, हा वाॅर्ड महात्मा गांधी वाॅर्ड नावाने ओळखला जाताे. या वाॅर्डमध्ये देशी व विदेशी दारू सहज उपलब्ध हाेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दारू पिणारी मंडळी या भागात विनामास्क फिरत असून, ते फिजिकल डिस्टन्सिंगचेदेखील पालन करीत नाहीत. त्यांचा हा प्रकार काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरत असल्याचेही काहींनी सांगितले.
दारू पिणाऱ्यांचा स्थानिक महिला व तरुणींना त्रास हाेताे. शहरात पाेलीस चाैकी असून, पाेलिसांना हा प्रकार माहिती आहे. मात्र, कुणीही अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत नाही. शिवाय, बंदीकाळातही दारूविक्री करण्यात आली असून, उपाययाेजनांचे उल्लंघन करण्यात आले. मात्र, प्रशासनाने साधी दंडात्मक कारवाईदेखील केली नाही, असा आराेपही स्थानिक नागरिकांनी केला असून, या अवैध दारूविक्रीला कायमचा आळा घालण्याची मागणी महिलांनी केली आहे.