कारवाई सुरूच : डाळ साठेबाजांविरुद्ध प्रशासन गंभीर नागपूर : डाळीच्या अवैध साठ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर आटोकाट प्रयत्न केले जात असले तरी अवैध साठवणूक करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहे. आजवर खासगी गोदामांमध्ये अवैध साठा केला जात होता. परंतु काटोल येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामावर (वेअर हाऊस) टाकलेल्या धाडीत तब्बल २५ लाख रुपये किमतीचा अवैध तूरसाठा सापडला आहे. त्यामुळे आता शासकीय गोदामांमध्येसुद्धा डाळीचा अवैध साठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. डाळीच्या साठेबाजीमुळे बाजारात डाळीचे भाव भरमसाठ वाढले. देशभरासह नागपुरातही तीच स्थिती आहे. त्यामुळे बाजारात तूर डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रशासन स्तरावर साठेबाजाविरुद्ध कारवाई केली जात आहे. जप्त करण्यात आलेली डाळ १०० रुपये किलोप्रमाणे विकण्याच्या हमीवर ती व्यापाऱ्यांना परतसुद्धा करण्यात आली होती. शासन आणि प्रशासन या दोन्ही स्तरावर डाळीच्या साठवणुकीविरुद्ध कडक पाऊल उचलले जात असले तरी साठेबाजांवर मात्र कुठलाही परिणाम होत नसल्याचे अलीकडच्या कारवाईवरून दिसून येत आहे. इतकेच नव्हे आता तर राज्य शासनाच्या ‘वेअर हाऊस’मध्येसुद्धा अवैध साठवणूक ठेवण्यापर्यंत व्यापाऱ्यांची मजल गेली आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने गेल्या गुरुवारी काटोल येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वेअर हाऊसच्या गोदामावर टाकलेल्या धाडीत २५ लाख २१ हजार रुपये किमतीची (३१५.१५ क्विंटल) तूर डाळ जप्त करण्यात आली होती, हे विशेष. राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये माल ठेवताना फारशी चौकशी होत नसल्याची बाब आढळून आली आहे. केवळ शेतकऱ्याचा माल आहे आणि जागा उपलब्ध आहे, त्याच्याकडे परवाना आहे किंवा नाही, इतकेच तपासले जाते. परंतु याबाबीसुद्धा फारशा गांभीर्याने पाहिल्या जात नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शासनाच्या गोदामामध्येअवैध साठवणूक करणे साठेबाजांना अधिक सोईचे जात असल्याची माहिती आहे. प्रशासनातर्फे ही बाब उघडपणे नाकारली जात असली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात अधिकारी गंभीर असून पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने शासकीय गोदांमाचे निरीक्षण केले जात आहे, आणि लवकरच आणखी काही साठा उघडकीस येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) नियमित तपासणी सुरूच आहे कुठलेही वेअर हाऊस असो आमची नियमित तपासणी सुरूच आहे. काटोल व वाडीमध्येसुद्धा तपासणी करण्यात आली त्यात काही आढळून आले नाही. राज्य वखार महामंडळाच्या वेअर हाऊसचा विचार केला तर २००८ मध्ये व २००९ मध्येसुद्धा डाळीचा अतिरिक्त साठा सापडला होता. - नरेश वंजारी जिल्हा पुरवठा अधिकारी, नागपूर
शासकीय गोदामातही अवैध साठवणूक
By admin | Published: July 25, 2016 2:41 AM