मनाेज जयस्वाल
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिवराबाजार : माेगरकसा (ता. रामटेक) संरक्षित जंगलातील कम्पार्टमेंट क्रमांक-४३८ मधील सागवानाची २७ झाडे परस्पर ताेडून लाकडं चाेरून नेली आहेत. वन अधिकाऱ्यांनी पंचनामा करून बुंध्यांवर हॅम्बर मारले आणि चाेरट्यांचा शाेध सुरू केला. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याचेही वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तपासातील संथपणा चाेरट्यांच्या पथ्यावर पडणारा असून, त्यांना लाकडांची विल्हेवाट लावण्यास बराच अवधी मिळत आहे.
वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना कम्पार्टमेंट क्रमांक-४३८ मध्ये ट्रॅक्टरच्या चाकांच्या खुणा आढळून आल्या. त्यांनी या संपूर्ण कम्पार्टमेंटची पाहणी केली असता, सागवानाची २७ झाडे ताेडून लाकडे चाेरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी बुंध्यांवर हॅम्बर मारून पुढील प्रक्रिया सुरू केली.
या प्रकरणात वन कर्मचाऱ्यांना सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांना अटक करण्यात आली नाही. मागील १२ दिवसांपासून अधिकारी या प्रकारणाचा केवळ तपास करीत आहेत. या जंगलात अवैध वृक्षताेड नवीन नाही. मात्र, आराेपींना पकडण्यास व या वृक्षताेडीला आळा घालण्यात वन अधिकाऱ्यांना अद्याप यश आले नाही.
...
४६ लाकडं जप्त
चाैकशीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना हिवराबाजार (ता. रामटेक) शिवारातील रामचंद्र शिंगाडे यांच्या शेतात सागवानाचे १३ लाकडं आढळून आली. ते शेत चिंतामन मेहर (३२, रा. सालई, ता. रामटेक) याने ठेक्याने केले आहे. याच भागात त्यांना अन्य एका ठिकाणी ३३ लाकडं आढळून आली. त्यामुळे त्यांनी ही ४६ लाकडं जप्त करून वन विभागाच्या पवनी (ता. रामटेक) डेपाेत जमा केले. या लाकडांची एकूण किंमत १ लाख ५८ हजार रुपये आहे. लाकडांची वाहतूक करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर जप्त केले नाही.
...
मुख्य आराेपीचा शाेध सुरू
वन विभागाने या प्रकरणात सालई (ता. रामटेक) येथील सहा जणांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. यातील चिंतामण मेहर याने ही झाडे ताेडल्याचे कबूल केले आहे, अशी माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, त्याला अद्यापही अटक करण्यात आली नाही. सागवान ताेडणारा मुख्य आराेपी वेगळा असून, त्याचा शाेध सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या सहा जणांकडून मुख्य आराेपीचा नाव व सुगावा मिळू शकताे. तरीही त्यांना मुख्य आराेपीचा शाेध घेण्यास अडचणी येत आहेत.
...
पक्षी अभयारण्य
मोगरकसा जंगल पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने या क्षेत्रामध्ये दोन महिन्यापासून वन अधिकाऱ्यांचे वारंवार दौरे सुरू आहेत. मोगरकसा मुख्य गेटपासून एक किमीवर ही अवैध सागवानताेड करण्यात आली. याच भागात ही अवैध वृक्षताेड झाल्याने नवल व्यक्त केले जात आहे. याच ठिकाणापासून आठ किमीवर असलेल्या शेतातून लाकडं जप्त करण्यात आली.
...
हा गंभीर प्रकार आहे. सध्या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आराेपीला अटक केली जाईल. त्यांच्याकडून झाडे ताेडण्यासाठी वापरलेले अवजारे, वाहतुकीसाठी वापरलेले वाहन व इतर साहित्य जप्त केले जाईल. यासाठी वेगळी टीम तयार केली आहे.
- रितेश भाेंगाडे,
वन परिक्षेत्र अधिकारी, पवनी.