लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किराणा व्यापाऱ्यास त्रास देऊन एक लाख रुपयाची वसुली करणारे पीएसआय आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर यशोधरा पोलीस ठाणे हादरले आहे. अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर वसुली करणारे यशोधरानगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अवैध धंद्याशी जुळलेल्या लोकांनाही लगेच सतर्क करीत काही दिवसांसाठी अवैध धंदे बंद करण्याचा सल्ला दिला होता.
झोन पाचचे डीसीपी नीलोत्पल यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. नीलोत्पुल यांनी पीडित व्यापाऱ्याला लगेच बोलावून घेत विचारपूस केली. यात मारहाण करून एक लाख रुपये वसूल केल्याची माहिती उघडकीस आली. नीलोत्पल यांनी सादर केलेल्या रिपोर्टच्या आधारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी रात्री पीएसआय श्रीनिवास दराडे, हवालदार मनीष भोसले, शिपाई राजकुमार पाल आणि प्रसन्नजीत जांभुळकर यांना निलंबित केले. सूत्रानुसार गुन्हेगारांप्रमाणे करण्यात आलेली ही वसुली अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर झाली हाोती. त्यामुळेच ३० मे रोजी दिवसभर ठाण्यात सुरू असलेल्या घटनाक्रमाबाबत अधिकारी डोळे बंद करून होते. यानंतरही हे अधिकारी कारवाईतून सुटले. सूत्रानुसार डीसीपी नीलोत्पल यांनी तपासात या प्रकरणाशी संबंधित लोकांनी अधिकारी यात सामील असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.
यशोधरानगर पोलिसांवर गेल्या तीन महिन्यात हा दुसरा ठपका आहे. यशोधरा पोलीस, एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांद्वारे होत असलेले ब्लॅकमेलिंग आणि वसुलीमुळे त्रस्त होऊन अंबरनाथ ठाणे, येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांनी १८ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. ठाणे पाोलिसांनी १२ मार्च रोजी यशोधरानगरचे ठाणेदार अशोक मेश्राम, तत्कालीन ठाणेदार रमाकांत दुर्गे, पीएसआय चव्हाण यांच्यासह सात लोकांना आरोपी बनविले होते. मेश्राम यांना न्यायालयातर्फे अंतरिम जामीन मिळाला
आहे. दुर्गे फरार आहे तर चव्हाण तुरुंगात आहे. दुर्गेच्या अटकेसाठी ठाणे पोलिसांनी नागपूर पोलिसांची मदतसुद्धा मागितली आहे. वसुली आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही यशोधरानगर पोलिसांमध्ये काहीही सुधारणा झाली नाही. ताजे प्रकरण याचा पुरावा आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची सूचना मिळताच सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात कलेक्शनचे काम करणारे सक्रिय झाले. त्यांनी रात्रीच अवैध धंद्यांशी जुळलेल्या लोकांना सतर्क केले. त्यांना स्वत:ला वाचवण्याचा सल्ला दिला.
बॉक्स
पाच मिनिटात परत केली रक्कम
स्वत:ला वाचविण्यासाठी निलंबित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी किराणा व्यापाऱ्यास पाच मिनिटात एक लाख रुपये परत केले होते. ही रक्कम एका अधिकाऱ्याच्या रायटरने आणून दिली होती. पाच मिनिटातच रायटरद्वारा रक्कम परत केल्याने अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. रक्कम परत केल्यानंतर याबाबत कुणालाही न सांगण्याचा सल्लाही देण्यात आला होता.