शहरात राहून दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय : पोलीस आयुक्तांचा ठाणेदारांना सल्ला
नागपूर : शहरात राहून ग्रामीण भागात किंवा दुसऱ्या भागात अवैध धंदे चालविणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी आयोजित गुन्हे शाखेच्या बैठकीत वरिष्ठ अधिकारी आणि ठाणेदारांना अशा गुन्हेगार आणि अवैध धंद्यांशी निगडित आरोपींना धडा शिकविण्याचे निर्देश दिले. पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे ठाणेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांविरुद्ध अभियान सुरु केले आहे. शहरात लपून छपून सुरु असलेले तुरळक अवैध धंदेही त्यांनी बंद केले होते. शहरातील मोठ्या गुन्हेगारांकडून ग्रामीण भागात आणि दुसऱ्या जिल्ह्यात अवैध धंदे चालविण्यात येत असल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना असे अवैध धंदे सुरू असतील तर ही बाब पोलिसांसाठी गंभीर असल्याचे सांगितले. ते म्हणाले, गुन्हेगारीवर अंकुश लावून भयमुक्त शहर बनविण्यासाठी पावले उचलण्यावर संकोच करायला नको. खुनाच्या घटना थांबविण्यासाठी ठाणेदारांना तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले. मकोका, एमपीडीएतून मुक्त झालेल्या आरोपींवर लक्ष देऊन ठाण्यातील टॉप २० गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे. झोपडपट्टी सर्चिंग आणि क्रॅक डाऊन मोहीम चालविण्यात यावी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावण्यापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. नव्या वर्षात गुन्हेगार सक्रिय होण्याची शक्यता असून खबरदारी बाळगण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
...........
नवे वर्ष होऊ शकते खराब
शहरातील काही कुख्यात गुन्हेगार शहर पोलिसांच्या सीमेबाहेर जुगार अड्डे चालवित आहेत. कालु, बावाजी, राऊत, गणेश अशी अनेक नावे आहेत जे अवैध धंद्याच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल करीत आहेत. हे अड्डे इतर गुन्हेगारांच्या डोळ्यात खटकत आहेत. या गुन्हेगारांचे नवे वर्ष खराब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पोलीस विभागात दलाल म्हणून सक्रिय कर्मचाऱ्यांवरही विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे.
............