लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरासह तालुक्यात विविध अवैध धंद्यांना उधाण आले आहे. या अवैध धंद्यांना पाेलिसांचे अप्रत्यक्षरीत्या पाठबळ आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास हाेत असल्याने या अवैध धंद्यांना कायमचा आळा घालावा, अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कळमेश्वर-ब्राह्मणी शहर तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये देशी, विदेशी दारूची अवैध विक्री केली जात असून, काही ठिकाणी मटका व जुगार खेळला जाताे. काही तर जुगाराचे क्लबही चालवतात. या अवैध धंद्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी कळमेश्वर पाेलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या बीट अंमलदारांकडे तक्रारीदेखील केल्या. मात्र, त्यांनी या अवैध धंद्यांना आळा घालण्याऐवजी तक्रारकर्त्यांनाच धमकावले, असा आराेपही या निवेदनात केला आहे.
गल्लीबाेळात जुगार खेळला जात असून, दारूविक्री केली जात असल्याने अनेक तरुण त्याच्या आहारी गेले आहेत. या अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या पैशाच्या वादातून हाणामारीदेखील हाेत आहे. याकडे पाेलीस कानाडाेळा करीत असल्याने तालुक्यात गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत असताना अनेक घटनांच्या नाेंदी केल्या जात नसल्याने कागदाेपत्री कमी गुन्हे दाखवले जातात.
या अवैध धंद्यांना आळा घालून त्यातून उद्ध्वस्त हाेणारी कुटुंबे वाचवावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळात शिवसेनाप्रणीत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत इखार, सुरेश लंगडे, सचिन रघुवंशी, प्रदीप गोतमारे, विजय वाघधरे, संजय रक्षक, विलास बारमासे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश हाेता.