लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : तालुक्यात राजराेसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा नायनाट करण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली. यावर उपाय म्हणून नरखेड ठाण्याचे पाेलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पाेलीस ठाण्यांतर्गतच्या प्रत्येक गावात महिला सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येणार असून, महिला दक्षता समिती व महिला पाेलीस अवैध धंद्यांवर अंकुश लावणार आहे.
दक्षता समितीतील महिला गाव आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत थेट ठाणेदारांना माहिती देतील. यामध्ये गावात स्थापन करण्यात आलेल्या महिला सुरक्षा मंडळास पाेलिसांकडून सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. यात महिला मंडळास पाेलीस निरीक्षकांचा वैयक्तिक माेबाइल क्रमांक देण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महिला पाेलीस कर्मचारी मनीषा सावरकर यांच्या मार्गदर्शनात माेहदी (दळवी), माेहदी (हेटी), तिनखेडा, माेवाड येथे महिला सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. यामुळे अवैध धंदे बंद करण्यासाठी माेठी मदत हाेणार असून, आगामी काळात संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे गावात सुरू असलेला जुगार, दारू विक्री, सट्टापट्टी, हातभट्टी तसेच समाज विघातक कृत्यांची माहिती पाेलिसांना मिळणार असून, महिला सुरक्षा मंडळांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाईचा मार्ग ठरविला जाणार आहे.
......
जामीन मिळणार नाही
अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध पाेलीस कारवाई केली जाते. परंतु त्याना जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा त्याच अवैध धंद्यांकडे वळतात. ही बाब लक्षात घेता पाेलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनात अवैध धंदे करणाऱ्यांना जामीन न मिळण्याबाबत नरखेड येथील न्यायाधीशांना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना आता जामीन मिळणे कठीण हाेणार असल्याचे ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी स्पष्ट केले.